मागील काही दिवसांत महाराष्ट्रासह देशात करोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. करोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता डीजीसीए अर्थातच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नवीन नियमावली जारी केली आहे. आता विमानातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मास्क वापरणं अनिवार्य केलं आहे. तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर योग्य ती कारवाई करण्याचा आदेश डीजीसीएकडून देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने डीजीसीएच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते.
त्यानंतर विमानतळावर करोना नियम कठोर करण्यात आले आहेत. बुधवारी ८ जून रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमानतळ आणि विमान कंपन्यांना निर्देश दिले आहेत. मास्क घालण्यासह कोविड-१९ च्या इतर नियमांचं काटेकोर पालन करावं, असं संबंधित आदेशात म्हटलं आहे. तसेच विमानतळ परिसरात आणि विमान प्रवासात मास्क घालण्यास नकार देणार्या किंवा कोविड-१९ प्रोटोकॉलचं उल्लंघन करणार्या प्रवाशांवर कारवाई करण्याचे आदेश विमान कंपन्यांना देण्यात आले आहेत.
सर्व प्रवाशांनी प्रवासादरम्यान फेस मास्क योग्य प्रकारे परिधान केला आहे की नाही? याची खात्री करण्यास डीजीसीएने सांगितलं आहे. याशिवाय मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांना विमानतळ परिसरात प्रवेश न देण्याचे आदेशही केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि इतर पोलीस कर्मचार्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे येथून पुढे मास्कशिवाय विमानतळ परिसरात प्रवेश मिळणार नाही.
जर कुणी प्रवासी वारंवार सांगूनही नियमांचे पालन करत नसेल तर संबंधित प्रवाशाला उड्डाण घेण्यापूर्वीच विमानातून खाली उतरण्यात येईल. तसेच कोविड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. विमान प्राधिकरणाने कर्मचारी, सुरक्षा जवानांना सक्तीनं याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मास्क न घालणाऱ्या प्रवाशांवर दंडही आकारला जाऊ शकतो.