माहिती संरक्षण कायद्याचे (डेटा प्रोटेक्शन लॉ) गंभीर उल्लंघन केल्याबद्दल ब्रिटनच्या इन्फॉर्मेशन कमिशनर कार्यालयाने (आयसीओ) फेसबुकला तब्बल ५ लाख पौंडांचा दंड ठोठावला. कायद्यानुसार या कार्यालयाला एवढय़ा कमाल रकमेचा दंड ठोठावण्याचा अधिकार आहे.
यावर्षीच्या सुरुवातीला बातम्यांचा विषय ठरलेल्या केंब्रिज अॅनालिटिका माहिती घोटाळ्यात अमेरिकेतील ‘फेसबुक’ या समाजमाध्यमाच्या भूमिकेबद्दल ब्रिटनच्या या स्वतंत्र डेटा वॉचडॉगने हा दंड ठोठावला आहे.
२००७ ते २०१४ या कालवधीत फेसबुकने ‘अॅप्लिकेशन डेव्हलपर्स’ला वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहितीपर्यंत पोहचण्याची (अॅक्सेस) परवानगी देऊन या माहितीवर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया केली. ज्या वापरकर्त्यांनी अॅप डाऊनलोड केले नव्हते, पण ते केवळ असे अॅप असणाऱ्यांच्या ‘फ्रेंड्स लिस्ट’मध्ये होते, अशाही वापरकर्त्यांची माहिती अॅक्सेस करण्यात आल्याचे आपल्या तपासात आढळल्याचे आयसीओने सांगितले.
माहितीचे बेकायदेशीररीत्या ‘प्रोसेसिंग’ करताना, त्यापूर्वी आणि त्यानंतरही वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे पुरेसे संरक्षण करण्यात फेसबुक अपयशी ठरले. एवढय़ा मोठय़ा आणि तज्ज्ञ कंपनीला या गोष्टी माहीत असायला हव्या होत्या आणि त्यांनी हे काम अधिक चांगल्यारीतीने करायला हवे होते, असे इन्फर्मेशन कमिशनर एलिझाबेथ डेनहॅम यांनी नमूद केले.
फेसबुकने केलेले कायद्याचे उल्लंघन इतके गंभीर असल्याचे आम्हाला वाटले, की आम्ही यापूर्वीच्या कायद्यानुसार जास्तीत जास्त दंड ठोठावला, असे डेनहॅम यांनी सांगितले.
ब्रिटनच्या डेटा प्रोटेक्शन अॅक्ट १९९८ अन्वये हा दंड ठोठावण्यात आला आहे. या कायद्याच्या जागी यावर्षीच्या मे महिन्यात डेटा प्रोटेक्शन अॅक्ट २०१८ हा नवा कायदा लागू करण्यात आला आहे.