गेल्या महिन्याभरात फेसबुकची कमी झालेली युजर्सची संख्या, मार्क झकरबर्गच्या वैयक्तिक संपत्तीत तसेच शेअर्समध्ये झालेली घट या पार्श्वभूमीवर फेसबुकमध्ये लवकरच काही नव्या उपाययोजना पाहायला मिळण्याची शक्यता अनेक व्यवसाय तज्ज्ञ व्यक्त करत होते. अखेर त्याची घोषणा खुद्द मार्क झकरबर्गनंच केली असून फेसबुकच्या कर्मचाऱ्यांचं त्यानं बारसंच करून टाकलं आहे. याशिवाय इतर काही गोष्टींसोबतच कंपनीचं ब्रीदवाक्य देखील त्यानं बदलून टाकलं आहे. काही महिन्यांपूर्वीच फेसबुकच्या मूळ कंपनीचं नामकरण ‘मेटा’ असं करण्यात आलं होतं. त्यानंतरचा हा दुसरा मोठा बदल आहे!
गुगलचे गुगलर्स, तसे मेटाचे…
कर्मचाऱ्यांच्या नव्या नावासंदर्भात मार्क झकरबर्गनं माहिती दिली आहे. ज्या प्रकारे गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना गुगलर्स म्हणतं, मायक्रोसॉफ्ट आपल्या कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टीज म्हणतं तसंच आता मेटाच्या कर्मचाऱ्यांना ‘मेटामेट्स’ म्हटलं जाईल, असं मार्क झकरबर्गनं जाहीर केलं आहे. लवकरच हे बदल लागू केले जातील असं मार्कनं फेसबुक कर्मचाऱ्यांशी बोलताना सांगितलं आहे.
फेसबुकच्या शेअर्सची ऐतिहासिक घसरण, मार्क झुकरबर्गला बसला ३१ अब्ज डॉलर्सचा फटका!
फेसबुकचं नवीन ब्रीदवाक्य!
दरम्यान, कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे संबोधलं जाईल, यासोबतच मार्कनं फेसबुकची मूळ कंपनी मेटासाठी नवीन ब्रीदवाक्याची घोषणा केली आहे. आता मेटाचं नवीन ब्रीदवाक्य ‘मेटा, मेटामेट्स अँड मी’ असं असेल. “हे नवीन ब्रीदवाक्य म्हणजे आपली एकमेकांप्रती आणि कंपनीच्या एकत्रित यशाप्रती असलेली जबाबदारी आहे. आपण कंपनीची आणि एकमेकांची काळजी घेणं या ब्रीदवाक्यातून प्रतीत होत आहे”, असं त्यानं जाहीर केलं आहे.