ह्युमन्स ऑफ हिंदुत्व हे फेसबुकवरील लोकप्रिय पेज काही हिंदुत्ववाद्यांनी दिलेल्या धमक्यांमुळे बंद करण्यात आले आहे. काल गुरुवारी या पेजच्या अॅडमिनिस्ट्रेटरने हा निर्णय घेतला. विडंबनामध्ये माहीर असलेल्या या पेजकर्त्याचा फोन नंबर काही माथेफिरूंच्या हाती लागल्याचे एका पत्रकाराने ट्विट केले. अॅडमिनिस्ट्रेटरला ठार मारण्याच्या धमक्या या फोनवर देण्यात आल्या. पत्नी व मुलांची आपल्याला चिंता वाटत असल्याने आपण हे पेज बंद करत आहोत असे त्याने आपल्या पत्रकार मित्राला सांगितले.
या देशात कुणाला विनोद समजत नाही असे मत खेदाने एका पत्रकाराने या प्रकरणी भाष्य करताना व्यक्त केले आहे. ह्युमन्स ऑफ हिंदुत्व या पेजला एक लाखापेक्षा जास्त लाइक्स होते. धार्मिक दहशतवाद, नैतिकते चा आग्रह धरणारे स्वयंघोषित नेते, गोरक्षक आणि अंधश्रद्धा यांच्याविरोधात ह्युमन्स ऑफ हिंदुत्व सातत्याने उपहासात्मक लिखाण करत असे.
मी स्वत:हून पेज बंद करत आहे, मला बॅन करण्यात आलेले नाही असे त्याने म्हटल्याचे दी वायर या वेबसाइटने म्हटले आहे. मला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असून मी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही असेही अॅडमिनिस्ट्रेटरने नमूद केले आहे. मी मध्यमवर्गीय आहे, भाजपाशासित राज्यात राहतो आणि मला राजकीय पाठबळ नाही असे सांगत या पेजकर्त्याने पेज बंद करण्याचा मार्ग निवडला आहे.
गौरी लंकेश वा अफ्रझुल खानच्या मार्गाने जाण्याची माझी इच्छा नसल्याचेही त्याने म्हटले आहे. तसेच स्वत:पेक्षा आपण कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी हा मार्ग निवडत असल्याचे त्याने म्हटले आहे. डेव्हिड विरुद्ध गोलिएथ ही लढत जिंकल्याबद्दल हिंदुत्वाचे अभिनंदन असेही त्याने नमूद केले आहे. हे पेज बंद करण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाहीये. या आधी सप्टेंबरमध्येही ट्रोल्सला वैतागून हे पेज बंद करण्यात आले होते. मात्र, वाचकांनी प्रचंड प्रमाणात अनुकूल प्रतिसाद दिल्यानंतर व पेज बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर पेजकर्त्याने काही काळ पेज सुरू ठेवू असे सांगत वाचकांच्या विनंतीचा मान राखला होता.
मात्र, आता त्यांचा फोन नंबर विरोधकांच्या हाती लागल्याने व जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे.