फेसबुकने आज अँड्रॉइड फोनसाठी नवीन संदेश उपयोजन (न्यू मेसेंजर अ‍ॅप) सुरू केले असून, त्याच्या मदतीने फेसबुक खाते नसलेल्यांसह सर्वजण एकमेकांना फोनवरून संदेश पाठवू शकतील व ग्रहण करू शकतील.
फेसबुक या सोशल नेटवर्किंगमधील अग्रेसर कंपनीने त्यासाठी इतर कंपन्यांशी भागीदारी केली आहे. आता वापरकर्ते मेसेंजर अकाऊंटवर केवळ नाव व फोन नंबर देऊन साइनअप करू शकतील. त्यानंतर त्यांना फेसबुकवरून त्यांच्या फोनवर असलेल्या संपर्क यादीतील लोकांना संदेश पाठवता येईल असे फेसबुकने म्हटले आहे.
अँड्रॉइडवर ही सेवा मेसेंजरवर पहिल्यांदा भारत, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, व्हेनेझुएला व दक्षिण आफ्रिका या देशात सुरू केली जात असून इतर देशांतही ती नंतर सुरू होणार आहे. नवीन मेसेंजरचा अनुभव चांगला असावा व त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी हे नवीन उपयोजन सुरू केले असून, त्यात तुमच्या फोनमधील संपर्कयादीत असलेल्या कुणालाही फेसबुकवरून संदेश पाठवता येणार आहे. केवळ फेसबुकवर असलेल्यांनाच नव्हेतर इतरांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
मेसेंजर हे एकमेव मोबाईल उपयोजन (अ‍ॅप) असून ते मोफत डाऊनलोड करता येईल, त्यात ग्राहकांच्या सध्याच्या डेटा प्लानचा वापर केला जाईल. ज्यांनी हे मेसेंजर अ‍ॅप डाऊनलोड केलेले नाही त्यांना कुणीही पाठवलेले संदेश फेसबुकवर लॉगइन केल्यावर बघता येतील. अँड्रॉइडसाठी मेसेंजर अ‍ॅप आज उपलब्ध करण्यात आले आहे.   

Story img Loader