पूर्वाश्रमीच्या फेसबुकच्या उत्पादन व्यवस्थापक असलेल्या फ्रान्सेस हॉगेन या महिला कर्मचाऱ्याने तिचा माजी बॉस आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन पायउतार होण्याचा सल्ला दिलाय. अनेक गोष्टी वापरुन कंपनीचं रिब्रॅण्डींग करण्याऐवजी मार्कने पदाचा राजीनामा द्यावा असं हॉगेननं म्हटलं आहे. हॉगेनने फेसबुकने चुकीच्या पद्धतीने कागदपत्रं वापरुन माहितीचा वापर केल्याच्या धक्कादायक दावा काही आठवड्यांपूर्वी केलेला. ती फेसबुकमधील कामाकाजाबद्दल बोलणारी जागल्या म्हणजेच व्हिसल ब्लोअर म्हणून सध्या अमेरिकेत फार चर्चेत आहेत. फेसबुकमधील कार्यपद्धतीबद्दल धक्कादायक दावे करणारी हॉगेन तिने केलेल्या आरोपांनंतर पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावरुन जगासमोर आली.
“मार्क झुकरबर्गच सीईओ राहिला तर कंपनीमध्ये बदल होणार नाही असं मला वाटतं”, असं हॉगेन म्हणाली आहे. पोर्तुगालची राजधानी लिसबॉन येथे आयोजित केलेल्या वेब परिषदेच्या पहिल्याच दिवशी ती बोलत होती. मार्कने राजीनामा द्यावा का असा प्रश्न विचारण्यात आला असताना हॉगेनने सकारात्मक उत्तर दिलं. “कदाचित ही एखाद्या वेगळ्या व्यक्तीने फेसबुकचं नेतृत्व करण्याची संधी असल्यासारखं असेल. मला वाटतं मार्कऐवजी सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या एखाद्या व्यक्तीने नेतृत्व करावं,” असं हॉगेन म्हणाल्याचं रॉयटर्सने म्हटलंय.
धक्कादायक आरोप
अनेकांना एकमेकांशी जोडत समाज बांधणी करत असल्याचे फेसबुकचे ‘दाखवायचे दात’ असून त्यांचे ‘खायचे दात’ हे प्रत्यक्षात केवळ कंपनीला मिळणाऱ्या नफ्याशीच संबंधित आहेत. ‘नफा की, समाजाचे हित’ अशी निवडीची वेळ आली की, दर खेपेस निवड मात्र नफ्याचीच होते. परिणामी असामाजिक बाबी वारंवार डोके वर काढतात. हे सारे एकूणच समाजासाठी घातक आहे, असं पहिल्यांदा फेसबुकविरोधी भूमिका घेताना ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील हॉगेनने म्हटलं होतं. तिने नंतर अमेरिकन काँग्रेससमोरही आपले म्हणणे मांडले. तत्पूर्वी ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि अमेरिकन सरकारी यंत्रणांनाही तिने भरपूर दस्तावेज सादर केले.
फेसबुकने नाव बदललं
जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने मागील आठवड्यामध्येच आपल्या मूळ कंपनीचं नाव बदलून मेटा असं केलं आहे. कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलताना आता कंपनी जी कामं करतेय ती सर्व फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नसल्याने कंपनीने मूळ कंपनीचं म्हणजेच पॅरेंट कंपनीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं झुकरबर्ग म्हणाला होता. झुकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितलं स्पष्ट केलेलं.