काँग्रेसच्या मुस्लिम मंत्र्याने हिंदू पोलीस कर्मचाऱ्याला जबरदस्तीने शिळं अन्न भरवलं का ? कर्नाटकमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री जमीर अहमद खान यांचा हिंदू पोलीस कर्मचाऱ्याला आपल्याच ताटातील अन्न भरवत असतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा फोटो व्हायरल होत आहे.

एका ट्विटर युजरने कर्नाटकमधील काँग्रेसचे मुस्लिम मंत्री हिंदू पोलीस कर्मचाऱ्याला आपल्याच ताटातील अन्न भरवत असल्याचा दावा केला होता. कन्नड वेबसाइटची बातमी शेअर करत हा दावा करण्यात आला होता. अनेकांनी हे ट्विट शेअर केलं होतं. मात्र सत्य तपासलं असता हा फोटो खरा असून यामागे सांगण्यात आलेली गोष्ट खोटी असल्याचं समोर आलं आहे.

जे चार फोटो शेअर करण्यात आले आहेत त्यामध्ये खान वर्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या हाताने भरवत असल्याचं दिसत आहेत. जेव्हा खान यांना या फोटोबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी हे फोटो खरे असून 10 ऑक्टोबरला म्हैसूरमध्ये एका फूड फेस्टिव्हलच्या उद्घाटनादरम्यान काढण्यात आल्याची माहिती दिली. दसऱ्याला या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं होतं.

‘मी त्यादिवशी अनेक फूड स्टॉलचं उद्घाटन केलं होतं. हा फोटो तेथील कार्यक्रमाचा आहे’, असं खान यांनी सांगितलं आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या हाताने भरवण्यामागचं कारण विचारलं असता खान यांनी सांगितलं की, मी राजकारणात येण्याच्या आधीपासून म्हणजेच गेल्या 20 वर्षांपासून असं करत आहे.

‘यामुळे बंधूभाव वाढतो असं मला वाटतं कारण मीदेखील दुसऱ्यांच्या हातून जेवतो. या कार्यक्रमातही मी अंध मुलांना भरवलं. तेथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकासोबत, पोलीस कर्मचाऱ्यांसोबतही अन्न वाटून घेतलं’, असं खान यांनी सांगितलं आहे. अशाप्रकारे चुकीची माहिती पसरवणं चुकीचं असल्याचं खान यांनी सांगितलं आहे.

Story img Loader