बीडमध्ये झालेल्या हिंसाचाप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्टेटमेंट सातत्याने बदलले असल्याचा आरोप केला जातोय. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. त्यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना विपश्यनेची गरज असल्याचं म्हटलंय.
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गेल्या आठवड्या दिल्लीत येणार होते. परंतु, अमित शाहा यांना वेळ नसल्याने त्यांची दौरा रद्द झाला. मात्र, या आठवड्यात ते दिल्लीत येण्याची शक्यता आहे असं पत्रकारांनी विचारलं असता संजय राऊत म्हणाले, त्यांच्या शक्यतांची दखल घेण्याची महाराष्ट्राला गरज नाही. महाराष्ट्राचा कारभार दिल्लीतून चालतो. राजकीय निर्णयासह इतर निर्णय दिल्लीतून घेतले जातात. पोलीस स्टेशनलाही दिल्लीतून फोन येतो आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना माहित नसतं. कोणावर कारवाई करायची, कोणाला सोडायचं, कोणाला अडकावयचं, कोणाच्या मागे ससेमिरा लावायचा हे दिल्लीतून ठरतं. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री हे कायमचे दिल्लीत राहिले तरी याचा महाराष्ट्राला फार फरक पडत नाही.
दरम्यान, बीडमधील हिंसाचारप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची भूमिका बदलली असल्याचं पत्रकारांनी सांगितलं. तेव्हा संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना विपश्यनेची गरज आहे. एका कर्तबगार नेत्याला त्यांच्या दोन ज्युनिअरच्या हाताखाली काम करावं लागतंय, ही अस्वस्थता आहे. त्यामुळे त्यांना विस्मरण होतंय. गृहखात्यासह अनेक गोष्टींचा कारभार दिल्लीतून चालवला जातोय. महाराष्ट्र हा दिल्लीचा दास किंवा गुलाम झाला आहे. महाराष्ट्र हा दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झाला आहे.
इंडिया आघाडीची उद्या दिल्लीत बैठक
इंडिया आघाडीचे सगळ्या घटक पक्षांना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाजुन खरगे यांच्याकडून निमंत्रण गेलं आहे. नितीश कुमारांपासून उद्धव ठाकरे, शरद पवार इतर सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहत आहेत. आपचे नेते केजरीवाल त्यांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. पण ते उद्याची बैठक आटोपून बाहेर रवाना होतील, अशी माझी पक्की माहिती आहे, असं संजय राऊत म्हणाले.
आज उद्धव ठाकरे दिल्लीत येतील. दिल्लीत त्यांचा मुक्काम आहे. दिल्लीत महत्त्वाच्या गाठीभेटी आहेत. , बैठकीच्या आधी ते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतील. म्हणजे उद्या केजरीवाल दिल्लीत आहेत. झारखंडचं अधिवेशन सुरू आहे, त्यातही वेळ काढून झारखंडचे मुख्यमंत्री बैठकीला येण्यासंदर्भात संमती दर्शवली आहे. त्यांना येता आलं नाही तर ते झुमद्वारे उपस्थित राहतील. जवळजवळ सर्वच प्रमुख पक्षांना इंडिया आघाडीच्या बैठकीचं महत्त्व माहितेय. २०२४ च्या दृष्टीने उद्याची बैठक महत्त्वाची आहे. ही बैठक निर्णायक ठरेल. अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे, असं संजय राऊत म्हणाले.
लोकशाहीचं रक्षण करणं हा मुख्य अजेंडा आहे. अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्षांशी समन्वय साधून जागा वाटप होऊ शकते, यासंदर्भात चर्चा होऊ शकते, असंही राऊत म्हणाले.