India slams Pakistan in UN: संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UNHRC) ५८ व्या सत्रातील बैठकीत भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. भारताच्या स्थायी मिशनचे प्रतिनिधी क्षितिज त्यागी यांनी जिनिव्हा येथील बैठकीत सांगितले की, पाकिस्तान एक अपयशी राष्ट्र असून आंतरराष्ट्रीय मदतीवर ते पोसले जात आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवादी संघटना यांची युती लपवून पाकिस्तान स्वतःची प्रतिमा तर मलिन करतच आहे, शिवाय यूएनसारख्या आंतरराष्ट्रीय मंचाचाही गैरवापर करत आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश हा भारताचा अविभाज्य आणि अभिन्न भाग आहेत.

क्षितिज त्यागी काय म्हणाले?

भारतीय राजनैतिक अधिकारी क्षितिज त्यागी म्हणाले, पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया दुटप्पी आणि अमानवीय वृत्तीने भरलेल्या आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाख प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहिल. मागच्या काही वर्षांत या भागातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पातळीवर मोठी प्रगती झालेली आहे. भारत सरकार दहशतवाद मुक्त धोरण आखत असल्याचाच हा पुरावा आहे.

“पाकिस्तानचे नेते त्यांचे लष्कर आणि दहशतवादी संघटनांचे संबंध लपवू पाहत आहेत. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) याचा मुखपत्र म्हणून पाकिस्तानकडून वापर होत आहे. पाकिस्तानात अस्थिरता असून ते आंतरराष्ट्रीय मदतीवर टिकून आहेत. त्यांच्याकडून संयुक्त राष्ट्र परिषदेचा वेळ वाया घालवणे दुर्दैवी आहे. भारताने नेहमीच लोकशाही, विकास आणि प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान टिकविण्यावर भर दिला. पाकिस्तानने ही मूल्ये आत्मसात केली पाहिजेत”, असेही क्षितिज त्यागी म्हणाले.

पाकिस्तानात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असून अल्पसंख्यांकावर अत्याचार होत असल्यामुळे लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत, असा गंभीर आरोप भारताने केला. त्यागी यांनी म्हटले की, संयुक्त राष्ट्राने बंदी घातलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तान आश्रय देतो. पाकिस्तान स्वतःच एका अस्थिर शासन प्रक्रियेचा बळी आहे. अशात पाकिस्तानने दुसऱ्या देशाला शिकवू नये. पाकिस्तानने स्वतःच्या देशातील नागरिकांच्या समस्या काय आहेत? हे जाणून घ्यावे आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यागी म्हणाले.

Story img Loader