Faizabad MP Awadhesh Prasad breaks down over Dalit Woman Found Dead Ayodhya Crime : उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथील एका गावात २२ वर्षीय दलित महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळ्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच अयोध्या(फैजाबाद)चे खासदार अवधेश प्रसाद हे पत्रकारांसमोर दु:ख व्यक्त केले. दरम्यान खासदार अवधेश प्रसाद यांचा माध्यम प्रतिनिधींसमोर मोठ्याने रडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान पीडित महिलेच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की त्यांची मुलगी बेपत्ता होती आणि तिची हत्या करण्यात आली आहे. तसेच महिलेचे डोळे काढण्यात आल्याचा आणि तिच्या शरीरावर गंभीर जखमा आणि फ्रॅक्चर असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांना या घटनेबद्दल माहिती मिळताच त्यांना रडू कोसळले आणि ते पत्रकारांसमोरच डोक्यावर हात आपटून मोठ्यांने रडू लागले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून त्याचे सहकारी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. “मला दिल्लीत लोकसभेत जाऊ द्या, मी हे प्रकरण मोदींसमोर (पंतप्रधान) मांडेल आणि जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर मी राजीनामा देईन”, खासदार अवधेश प्रसाद असे म्हणताना ऐकू येत आहे.

नेमकं काय झालं?

मृत महिलेच्या कुटुंबियांनी सांगितले की ती महिला गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता होती. त्यानंतर त्यांनी शोध घेणे सुरू केले आणि शनिवारी सकाळी तिच्या मेव्हण्याला तिचा मृतदेह त्यांच्या गावापासून फक्त ५०० मीटर अंतरावर एका छोट्या कॅनलमध्ये सापडला. तिचे हात आणि पाय दोरीने बांधलेले होते आणि तिच्या शरीरावर अनेक खोल कापल्याच्या जखमा होत्या, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

ज्या गावकऱ्यांनी त्या महिलेचा मृतदेह उचलून घेतला त्यांच्या लक्षात आलं की तिचा एक पाय फ्रॅक्चर होता, महिलेची मृतदेहाची भयानक दुर्दशा पाहून मृत महिलेची मोठी बहीण आणि इतर दोन महिलांना चक्कर आली.

सर्कल ऑफिसर आशुतोष तिवारी यांनी सांगितलं की, पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार शुक्रवारी नोंदवली आहे. मृतदेह आढळून आल्यानंतर, आता शवविच्छेदनानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवली जाईल.

दरम्यान पीडित महिलेच्या कुटुंबियांनी पोलीसांनी कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी महिलेचा योग्य पद्धतीने शोध घेतला नाही असा कुटुंबियांचा दावा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Faizabad mp awadhesh prasad breaks into tears after brutally murdered dalit woman body found in ayodhya video viral rak