देशभरात व्यापक लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. १८ वर्षांपासून पुढच्या व्यक्तींना लस दिली जात आहे. कोविशिल्ड, कोवॅक्सिन, मॉडर्ना, स्पुटनिक व्ही आणि नुकतीच परवानगी मिळालेली जॉन्सन अँड जॉन्सन या लसी भारतीयांना दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये दिलासा मिळाल्याची भावना असतानाच जागतिक आरोग्य संघटनेनं एका गंभीर गोष्टीकडे जगाचं आणि विशेषत: भारताचं लक्ष वेधलं आहे. भारत आणि युगांडामध्ये Covishield लसीचे बनावट डोस आढळल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द सिरम इन्स्टिट्युटनं याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे लसीकरणामुळे करोनाची भिती काहीशी कमी होत असताना बनावट लसीमुळे ही भिती पुन्हा डोकं वर काढू लागली आहे.
२ मिलीच्या वायल्स आल्या कुठून?
जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO नं मंगळवारी यासंदर्भातला इशारा आपल्या संकेतस्थळावर देखील दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तपासणी विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. भारतामध्ये कोविशिल्ड लसीच्या २ एमएलच्या वायल्स आढळून आल्या आहेत. पण वास्तवात सिरम इन्स्टिट्युटकडून २ एमएलच्या वायल्स तयारच केल्या जात नाहीत. दुसरीकडे युगांडामध्ये १० ऑगस्टलाच एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या कोविशिल्ड लसींची एक बॅच दिसून आली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं यासंदर्भात अधिक जागरुकपणे काळजी घेण्याचं आवाहन देखील या देशांना केलं आहे.
लसींचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सिरमचा मोठा निर्णय; अदर पूनावाला यांनी केली घोषणा!
बनावट लसी नष्ट करणं आवश्यक
“अशा प्रकारच्या बनावट लसी जागतिक आरोग्यासाठी मोठी चिंतेची बाब ठरत असून करोना होण्याची शक्यता अधिक असलेल्या नागरिकांसाठी गंभीर ठरू शकतात”, असं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आळं आहे. “या बनावट लसी तातडीने शोधून काढून हटवणं हे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने फार आवश्यक आहे”, असं देखील WHO नं आपल्या वेबसाईटवर नमूद केलं आहे.
रुग्णालये, आरोग्य केंद्रांवर तपासणी वाढवा!
दरम्यान, बनावट लसींचा धोका टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून रुग्णालये, क्लिनिक्स, आरोग्य केंद्रे, वितरक, फार्मसी आणि वितरणाच्या इतर सर्व टप्प्यांवर बारीक नजर ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच, तुम्ही जर अशा प्रकारची लस घेतली असेल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं देखील आवाहन WHO नं केलं आहे.