Fake doctor performs heart surgeries in Madhya Pradesh Hospital : मध्य प्रदेशमध्ये एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली असून एक बनावट डॉक्टर रुग्णांच्या हृदय शस्त्रक्रिया करत असलेल्या प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील दामोह शहरातील एका खाजगी मिशनरी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. येथे एका बनावट डॉक्टरने रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया केल्याच्या आरोपांची सध्या जिल्हा अधिकारी चौकशी करत आहेत. दरम्यान या तोतया डॉक्टराने शस्त्रक्रिया केलेल्या किमान ७ जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

रुग्णालयात एका महिन्याच्या आत सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. एन जॉन केम नावाचे प्रसिद्ध ब्रिटिश डॉक्टर आपणच असल्याचे भासवून, या व्यक्तीने ख्रिश्चन मिशनरी रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ म्हणून पदभार स्वीकारल्याचा आरोप आहे. यानंतर या बनावट डॉक्टरने रुग्णांवर हृदय शस्त्रक्रिया देखील केल्या. या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा नंतर मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेच्या तपासानंतर आरोपीचे खरे नाव हे नरेंद्र विक्रमादित्य यादव असल्याचे उघड झाले.

दरम्यान बाल कल्याण समितीचे जिल्हा अध्यक्ष आणि वकील दीपक तिवारी यांनी मात्र या प्रकरणात खळबळजनक दावा केला होता. या प्रकरणातील अधिकृत मृत्यूंची संख्या ७ असली तरी प्रत्यक्षात ही संख्या खूप जास्त असल्याचे तिवारी म्हणाले होते. तसेच त्यांनी दमोह जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.

“काही रुग्ण, ज्यांचा मृत्यू झाला नाही ते आमच्याकडे आले आणि त्यांच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला की ते वडीलांना रुग्णालयात घेऊन गेले होते आणि तो व्यक्ती ऑपरेशन करण्यासाठी तयार होता, पण थोडेसे धास्तावलेला होते त्यामुळे ते वडीलांना जबलपूर येथे घेऊन गेले. त्यानंतर आम्हाला समजलं की रुग्णालयात हा बनावट डॉक्टर काम करत आहे. खरा व्यक्ती ब्रिटनमध्ये आहे आणि या व्यक्तीचे नाव नरेंद्र यादव आहे. त्याच्याविरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्याने कधीच त्याची खरी कागदपत्रे दाखवली नाहीत,” असे तिवारी यांनी एएनआशी बोलताना सांगितले.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूंगो (Priyank Kanoongo) यांनी सांगितलं की त्या मिशनरी रुग्णालयाला सरकारकडून आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पैसेही मिळत होते. “मिशनरी रुग्णालयात एक बनावट डॉक्टर रुग्णांवर शस्त्रक्रिया करत असल्याची आम्हाला तक्रार मिळाली. आम्हाला असेही सांगण्यात आले की मिशनरी रुग्णालय हे आयुष्यमान भारत योजनेशी जोडलेले आहे आणि त्यासाठी सरकारकडून ते पैसे देखील घेत आहेत. आम्ही या प्रकरणाची दखल घेतली आणि याचा तपास सुरू आहे,” असे प्रियांक कानूंगो म्हणाले.

आरोपांनंतर जिल्हा तपास पथकाने रुग्णालयातील सर्व कागदपत्रे जप्त केली आहेत. चौकशीत आढळून आले की या तोतयाने प्रसिद्ध ब्रिटिश डॉक्टराच्या नावाने बनावट कागदपत्रे सादर केली होती. तसेच हा आरोपी अनेक वादग्रस्त प्रकारणांमध्ये सहभागी राहिला आहे.

दमोह जिल्हा अधिकारी सुधिर कोचर यांनी तपास पूर्ण झाल्यानंतर याबद्दल माहिती दिली जाईल असे सांगितले आहे. तर दमोहचे पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, “आम्ही सध्या मिशनरी रुग्णालयात झालेल्या एकापेक्षा अधिक मृत्यूच्या प्रकरणाचा तपास करत आहोत.”

या बनावट डॉक्टरने यापूर्वी देखील स्वतःला ब्रिटिश डॉक्टर एन जॉन केम असल्याचे भासवल्याचा आरोप आहे, त्याने जुलै २०२३ मध्ये एक ट्विट केले होते, ज्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दंगली थांबवण्यासाठी फ्रान्समध्ये पाठवण्याची मागणी केली होती. या पोस्टची त्यावेळच्या अनेक नेत्यांनी खिल्ली देखील उडवली होती. त्या व्यक्तीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबरचे कथित फोटोशॉप केलेले फोटो देखील बनावट नावाने पोस्ट केले होते.