आतापर्यंत बनावट कागदपत्र, बनावट पुरावे सादर करून सरकारची फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु, आता चक्क बनावट टोल प्लाझा उभारून सरकारची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आणि ही घटना घडली आहे महाराष्ट्र राज्याच्या शेजारील राज्य असलेल्या गुजरातमध्ये. तब्बल दीड वर्षांनंतर हा प्रकार उजेडात आला आहे. NDTV ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातमधील बामनबोर-कच्छ राष्ट्रीय महामार्गावर खासगी जमिनीवर महामार्गाला बायपास करून बनावट टोल प्लाझा उभारण्यात आला होता. या टोल प्लाझावरून काही बलाढ्य लोकांनी सरकारी अधिकाऱ्यांची वर्षभरापासून फसवणूक केली. गुजरातमधील मोरबी येथे राष्ट्रीय महामार्गाला बगल देऊन खासगी जमिनीवर बनावट टोल प्लाझा उभारून त्यांच्या ‘टोल बूथ’वर निम्मी किंमत आकारून जनतेची, पोलिसांची आणि जिल्ह्यातील उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांची दीड वर्षे फसवणूक करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्गाचे अधिकृत टोल असलेल्या वघासिया टोल प्लाझाचे व्यवस्थापक म्हणाले, खाजगी जमीन मालक दीड वर्षांपासून दररोज हजारो रुपयांची खुलेआम फसवणूक करत आहेत. आरोपी व्हाईट हाऊस सिरॅमिक कंपनीच्या मालकीची जमीन, बंद कारखाना आणि वर्गासिया गाव या मार्गे वाहतूक प्रत्यक्ष मार्गावरून वळवत होते.

निम्मा टोल टॅक्समुळे चालकही खुश

अर्ध्या टोल टॅक्समुळे ट्रक चालकांना मार्ग काढण्यास प्रवृत्त केले आणि वर्षभरापासून अवैध कर वसुलीकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. “आम्हाला माहिती मिळाली की वर्गासिया टोल प्लाझा मार्गावरून काही वाहने वळवली जात आहेत आणि टोल टॅक्स वसूल केला जात आहे. याप्रकरणी पोलीस आणि इतर अधिकारी तपास करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना याबाबत सविस्तर माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे”, असे मोरबीचे जिल्हाधिकारी जीटी पंड्या यांनी सांगितले.

पोलिसांनी व्हाईट हाऊस सिरॅमिक कंपनीचे मालक अमरशी पटेल, वनराज सिंग झाला, हरविजय सिंग झाला, धर्मेंद्र सिंग झाला, युवराज सिंग झाला आणि अज्ञात लोकांविरोधात तक्रार नोंदवली. या भागातील बलाढ्य लोकांनी ट्रक चालकांकडून पैसे उकळले आणि त्यांना टोल भरण्यास भाग पाडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुन्हा दाखल झालेले काय म्हणाले?

अमरशी पटेल यांनी राजकोटमधील माध्यमांना सांगितले की, व्हाईट हाऊस टाइल्स प्रायव्हेट लिमिटेड (WHTPL), वांकानेर शहराजवळील NH 8A वरील NHAI च्या वघासिया टोल प्लाझाच्या पूर्व सीमेवर असलेले सिरेमिक टाइल उत्पादन युनिट, त्यांच्या कुटुंबाचे आहे. त्यांनी हा कारखाना एका व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिला आहे.

भाजपा कनेक्शन काय?

फानान्शिअल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अन्य चार आरोपींमध्ये रविराजसिंह झाला, हरविजयसिंह झाला, धर्मेंद्रसिंह झाला आणि धर्मेंद्रसिंह यांचा भाऊ युवराजसिंह झाला. वघासिया गावचे सरपंच धर्मेंद्रसिंह हे भाजपशासित वांकानेर तालुका पंचायतीच्या माजी अध्यक्षा रियाबा झाला यांचे पती आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake toll plaza set up on gujarat highway cheats government for 1 5 years sgk