एक्स्प्रेस वृत्त, चेन्नई : बिहारी स्थलांतरितांवर हल्ले होत आहेत असे ‘खोटे आणि निराधार’ ऑनलाइन वृत्त दिल्याच्या आरोपावरून तमिळनाडू पोलिसांनी दोन पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामध्ये एका हिंदी भाषक वर्तमानपत्राच्या संपादकांचा समावेश आहे. तर दुसरा पत्रकार बिहारमधील आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील भाजपचे नेते प्रशांत उमराव यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर भिन्न समूहांदरम्यान शत्रुत्व आणि बेबनाव वाढवण्याचा आरोप ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, तामिळनाडूमधील सर्व उत्तर भारतीय स्थलांतरित शांततेत वास्तव्य करत असल्याचे तेथील सरकारने स्पष्ट केले. भाजपने मात्र या मुद्दय़ावरून आक्रमक भूमिका घेतली, त्यानंतर बिहार सरकारने तमिळनाडूमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक पथक पाठवले. त्यानंतर झारखंड सरकारनेही पथक पाठवण्यासंबंधी घोषणा केली.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सभेला उपस्थित राहिल्याबद्दल बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावरही भाजपने हल्लाबोल केला. तेजस्वी यांच्यासह अनेक उत्तर भारतीय नेते या या वेळी उपस्थित होते. या सभेनंतर लगेचच भाजपच्या प्रशांत उमराव यांनी तमिळनाडूमध्ये बिहारी कामगारांना हिंदीतून संभाषण केल्याबद्दल फाशी दिल्याची खोटी माहिती ट्वीट केली. त्याच दिवशी दोन्ही पत्रकारांनीही त्यासंबंधी अफवा पसरवली, त्यामुळे राज्यातील उत्तर भारतीयांमध्ये भीती पसरल्याचे पोलिसांनी सांगितले. तमिळनाडूमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या उत्तर भारतीय कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या प्रकरणी तपास करण्यात आला आणि संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.