लग्न म्हटल्यावर गोंधळ हा आलाच. भारतामध्ये तर लग्नसमारंभाला एवढ्या मोठ्या संख्येनं लोक उपस्थित असतात की गोंधळ नाही झाला तरच नवल. मात्र एखाद्या लग्नात थेट हणामारीपर्यंत प्रकरण जाणं क्वचितच घडलं. मात्र उत्तर प्रदेशमधील देवरियामध्ये असाच एक अनपेक्षित प्रकार लग्नात घडला.
उत्तर प्रदेशमधील एका लग्नामध्ये वरपक्ष की वधूपक्ष कोण आधी फोटो काढणार या मुद्द्यावरुन वाद झाला. वधू-वराने एकमेकांना वरमाला घालण्याचा विधी झाल्यानंतर वरपक्ष आणि वधूपक्षामध्ये फोटोवरुन वाद सुरु झाला. नवदांपत्याचे फोटो आधी कोणी काढायाचे हा वादाचा मुद्दा होता. या वादामध्ये आधी शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर या बाचाबाचीचं रुपांतर थेट हाणामारीमध्ये झालं. हा सारा प्रकार ८ डिसेंबर रोजी घडला. लग्नासाठी रामपुर खरहाना धूसवरुन लग्नसाठी वरपक्षातील लोक माधवपूर गावामध्ये आले होते तेव्हा हा प्रकार घडला.
वरमाला घालून झाल्यानंतर लग्नामध्ये नातेवाईकांबरोबर फोटो काढण्यास सुरुवात झाली. यावेळी दारुच्या नशेत असलेल्या मुलीकडच्या वऱ्हाड्यांनी आम्हीच आधी फोटो काढणार असं म्हणत वधू-वरांच्या आजूबाजूला उभं राहण्यास सुरुवात केली. मात्र वरपक्षाकडील नातेवाईकांचीही हीच मागणी होती आणि ते सुद्धा नवदांपत्याच्या आजूबाजूला उभे राहू लागले. यावरुन दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचं रुपांतर पाहता पाहता धक्काबुक्कीमध्ये आणि नंतर मारहाणीत झालं. मुलीच्या काकांनी दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाच बेदम मारहाण करण्यात आलं. यामध्ये मुलीच्या बहिणीलाही मारहाण करण्यात आली.
रामपुर खरहाना पोलीस स्थानकामधील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर लग्नमंडपामधील हाणामारीत जखमी झालेल्या वऱ्हाड्यांना सदार रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. “गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आम्हाला लग्नामध्ये फोटो काढण्यावरुन वाद सुरु झाल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच जखमींना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस उपनिरिक्षक बलराम सिंह यांनी दिली.
या वादामुळे नवरा एवढा वैतागला होता की त्याने लग्नाला नकार दिला. मात्र नंतर त्याची समजूत काढल्यानंतर त्याने लग्नास होकार दिला आणि दोघेही विवाहबंधनात अडकले.