पीटीआय, वायनाड
लेबनॉनमधील पेजर स्फोटांच्या प्रकरणात नॉर्वेस्थित रिन्सन जोस या भारतीयाच्या कुटुंबाची चौकशी पोलिसांनी केली आहे. जोस हा मूळ केरळचा निवासी असून जोससह त्याच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची मागणी भाजपने केली आहे.

पोलिसांनी सांगितले, की कुठल्याही प्रकारचा खटला या ठिकाणी नाही. विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबाची पार्श्वभूमी तपासली. यामध्ये नवे असे काही नाही. अशा प्रकारची वृत्ते जेव्हा येतात, तेव्हा या प्रकारची तपासणी होतच असते. जोस याच्या कुटुंबीयांनी कुठल्याही प्रकारच्या संरक्षणाची मागणी केलेली नाही. रिन्सन जोस १० वर्षांपूर्वी नॉर्वेमध्ये रोजगारासाठी गेला. सध्या तो त्या देशाचा रहिवासी आहे.

हेही वाचा >>>चीनकडून ‘आपली’ परीक्षा! ‘क्वाड’ बैठकीत बायडेन यांची टिप्पणी; ‘हॉट माइक’मुळे जगजाहीर

दरम्यान, भाजप नेते संदीप वेरियार यांनी रिन्सन आणि त्याच्या कुटुंबीयाच्या संरक्षणाची मागणी केली आहे. रिन्सन या देशाचा सुपुत्र आहे. तो मल्याळी आहे. रिन्सन आणि त्याच्या कुटुंबीयांना आपण संरक्षण दिले पाहिजे.

‘रिन्सनने काहीही केलेले नाही’

रिन्सनचे मामा ठंकाचन म्हणाले, ‘वायनाडमध्ये रिन्सनचे बालपण गेले. केरळ आणि केरळबाहेरही त्याचे शिक्षण झाले. एमबीए झाल्यानंतर १० वर्षांपूर्वी तो भारताबाहेर गेला. आताच्या ठिकाणी नोकरी करण्यापूर्वी तो परदेशात अभ्यास करीत होता. सध्या तो नॉर्वेमध्ये एका कंपनीत काम करतो आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तो भारतात आला होता. त्याची पत्नीही नॉर्वेमध्ये काम करते. त्याने कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य केलेले नाही, याची आम्हाला खात्री आहे.’ लेबनॉनमध्ये झालेल्या पेजर स्फोट प्रकरणी नॉर्वेतील बनावट कंपन्यांची तेथील पोलीस चौकशी करीत आहेत. याबाबत कुठलीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया त्याच्या कुटुंबीयांनी दिली.