केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूविषयी तर्क-वितर्क थांबविण्यात यावेत, अशी विनंती पुष्कर यांच्या कुटुंबीयांनी संबधितांना केली आहे. सुनंदा यांचे वडील आणि बंधूंनी यासंबंधी तसे एक संयुक्त पत्रकही जारी केले आहे.
सुनंदा यांचा १७ जानेवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने होणाऱ्या चर्चेविषयी आम्ही कमालीचे त्रस्त झालो असून माध्यमांनी या चर्चेला, तर्काना आता तरी पूर्णविराम द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शशी थरूर हे तिरुवनंतपुरम् लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत असून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीने सुनंदा यांच्या मृत्यूसंबंधी पुन्हा निवडणूक प्रचारात विषय उपस्थित केला. सुनंदा यांनी आत्महत्या केली नाही किंवा या प्रकरणी अन्य कोणतेही काही कारण नसताना प्रसारमाध्यमे आणि काही हितसंबंधी व्यक्ती हा मुद्दा वारंवार उपस्थित करून सुनंदा यांच्या मृत्यूप्रकरणी विषप्रयोगाची शक्यता व्यक्त करीत आहेत. आता आलेल्या व्हिसेरा अहवालातही सुनंदा यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विष नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सर्व संबंधितांनी त्यांच्या मृत्यूसंबंधी अनावश्यक अंदाज बांधू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
आम्हाला शवविच्छेदनासंबंधी किंवा व्हिसेरासंबंधीही कोणतीही प्रत मिळालेली नाही. जे काही समजले आहे, ते माध्यमांमधूनच कळले. त्यामुळे पोलिसांनी हा तपास लवकरात लवकर संपवावा अशी विनंती सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर सुनंदा यांचे वडील लेफ्ट. कर्नल (निवृत्त) पुष्करनाथ दास, बंधू राजेश पुष्कर, आशीष दास आणि चिरंजीव शिव मेनन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.