पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या.

बुधवारी मृणालिनी यांना शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र गुरुवारी पहाटेच त्यांना त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मृणालिनी साराभाई यांचे निधन झाल्याचे त्यांच्या कन्या आणि विख्यात नृत्यांगना मल्लिका साराभाई यांनी फेसबुकवरून जाहीर केले.

चेन्नईतील स्वामिनाथन कुटुंबात जन्मलेल्या मृणालिनी भरतनाटय़म आणि कथकली या नृत्यप्रकारांत निपुण होत्या. मृणालिनी यांनी शांतिनिकेतन येथे रवींद्रनाथ टागोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले होते.

मृणालिनी या ‘अम्मा’ या नावाने सुपरिचित होत्या. त्यांनी १९४८ मध्ये दर्पण अकादमीची स्थापना केली होती आणि १८ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भरतनाटय़म आणि कथकली नृत्यप्रकारांत या अकादमीतून पदवी मिळविली आहे.