नवी दिल्ली : प्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी सकाळी दहा वाजून २० मिनिटांनी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. चित्रपटक्षेत्रात कारकीर्द सुरू केल्यानंतर एकपात्री विनोदी कलाकार (स्टँडअप कॉमेडियन) म्हणून तसेच नकलाकार (मिमिक्री आर्टिस्ट) म्हणून त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. अलीकडे ते राजकारणात सक्रिय झाले होते. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) गेले ४० दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते उत्तर प्रदेश फिल्म विकास परिषदेचे अध्यक्ष होते. गुरुवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

श्रीवास्तव यांनी २०१४ मध्ये समाजवादी पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये व्यायाम करत असताना त्यांना १० ऑगस्टला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने ‘एम्स’ रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर ‘अँजिओप्लास्टी’ करण्यात आली. त्यानंतर त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मात्र ते शुद्धीवर आले नव्हते. श्रीवास्तव यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेनेही त्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळले.

चित्रपट निर्माते राकेश रोशन, हृतिक रोशन, अजय देवगण, शेखर सुमन, अभिनेत्री निम्रत कौर आणि दिग्दर्शक संजय गुप्ता आदींनी श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असलेल्या राजू श्रीवास्तव यांनी २००५ मध्ये ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या वाहिनीवरील विनोदी कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात भाग घेतला. यात त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, ‘बॉम्बे टू गोवा’ (नवीन), मैं प्रेम की दिवानी हूं आणि ‘आमदानी अठन्नी खर्चा रुपय्या’ आदी चित्रपटांत काम केले. ‘बिग बॉस’ तिसऱ्या पर्वातही ते सहभागी झाले होते.

आदरांजली

राजू श्रीवास्तव यांनी सकारात्मकता, विनोद आणि हास्याने आपणा सर्वाचे जीवन फुलवले. ते आपल्याला अकाली सोडून गेले. मात्र असंख्या रसिक चाहत्यांच्या हृदयांत त्यांना अढळ स्थान राहील. त्यांनी अनेक वर्षे कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले.   नरेंद्र मोदी</strong>, पंतप्रधान

राजू श्रीवास्तव यांची एक अनोखी शैली होती आणि त्यांनी त्यांच्या अद्भुत प्रतिभेने सर्वाना प्रभावित केले. त्यांच्या निधनाने कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती लाभावी, अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. 

अमित शहा, गृहमंत्री

राजू श्रीवास्तव म्हणजे एक अद्भुत कलाकार आणि जिंदादिल व्यक्ती.  आपल्या कला आणि प्रतिभेने ते अनेक कलाकारांचे प्रेरणास्थान बनले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या वेगळय़ा विनोदी शैली युगाचा अंत झाला.

अनुराग ठाकूर, माहिती आणि प्रसारण मंत्री