एका प्रसिद्ध युट्यूबरने मंदिराचं नूतनीकरण करण्याच्या नावाखाली निधी गोळा करून त्याचा वैयक्तिक कारणासाठी खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तामिळनाडू पोलिसांनी सोमवारी सकाळी आरोपी युट्यूबरला अटक केली आहे. कार्तिक गोपीनाथ असं अटक केलेल्या आरोपी युट्यूबरचं नाव असून तो ‘इलया भारतम’ नावाचं युट्यूब चॅनेल चालवतो. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पेरांबलूर येथील अरुल्मिगु मधुरा कालियाम्मा थिरुकोइलचे कार्यकारी अधिकारी टी अरविंदन यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) आवाडी पोलिसांनी सोमवारी सकाळी आरोपी कार्तिक गोपीनाथला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, कार्तिक गोपीनाथ याने “इलया भारतम” नावानं यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. दरम्यान त्यानं अरुल्मिगु मधुरा कालियाम्मा मंदिरातील उपमंदिरांच्या पुतळ्यांचं नूतनीकरण करण्यासाठी लोकांकडे निधी मागितला. निधी उभारणीसाठी त्यानं एक वेबसाइट देखील तयार केली होती. अनेक श्रद्धाळू लोकांनी गोपीनाथकडे निधी जमा केला आहे. मिळालेल्या पैशाचा गैरवापर करत आरोपीनं तो पैसा वैयक्तिक कारणासाठी खर्च केल्याचा आरोप फिर्यादीनं केला आहे.
विशेष म्हणजे आरोपी युट्यूबर कार्तिक गोपीनाथ यानं निधी गोळा करण्यापूर्वी हिंदू मंदिर प्रशासनाकडून कोणतीही परवानगी न घेतली नव्हती, असा आरोपही टी अरविंद यांनी केला आहे. अरविंदन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.