Fancy Vehicle Number Plate : : फॅन्सी नंबर प्लेट किंवा व्हिआयपी (VIP) नंबर प्लेटची सध्याच्या काळात खूपच क्रेझ वाढल्याचं पाहायला मिळतं. व्हीआयपी नंबर हा गाडीच्या मालकांसाठी एक सिम्बॉलच बनत चालला आहे. एखाद्या व्यक्तीने नवी कार किंवा कोनतीही चार चाकी गाडी खरेदी केली तर त्या व्यक्तीला व्हीआयपी नंबर मिळावा असं वाटत असतं. मात्र, व्हीआयपी नंबरसाठी जास्त पैसे देखील मोजावे लागतात. आता नवीन वाहनांसाठी व्हीआयपी क्रमांक किंवा ‘चॉइस नंबर’साठी लागणाऱ्या शुल्कात पंजाबमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फॅन्सी नंबर प्लेटसाठी मूळ रकमेच्या सुमारे दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. तुम्ही पंजाबमधील असताल आणि तुम्हाला व्हीआयपी नंबर घ्यायचा असेल तर त्यासाठी आता अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. पंजाब परिवहन विभागाने चॉइस नंबर प्लेट्सच्या किमती वाढवल्या आहेत. तुम्हाला तुमचा पसंतीचा क्रमांक तुमच्या कारचा नंबर म्हणून हवा असल्यास आता जास्तीचा खर्च येणार आहे. आता उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास जर तुम्हाला तुमच्या गाडीचा ०००१ हा क्रमांक घ्यायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी ५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी ही रक्कम अडीच लाख रुपये ठेवण्यात आली होती. मात्र या रक्कमेत आता वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

कोणत्या चॉइस नंबरसाठी किती रुपये लागणार?

०००१ या नंबरसाठी ५ लाख, ०००२ ते ०००९ आणि ०७८६ नंबरसाठी २ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच ००१० ते ००९९ या नंबरसाठी तुम्हाला १ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच ०१००, ०२००, ०३००, ०४००, ०५००, ०६००, ०७००, ०८००, ०९००, १०००, ०१०१, ०१११, ०७७७, ०८८८, ०९९९, १७०१, ०२९५, १३१३ या नंबरसाठी १ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच २०००, ३००० आणि ४००० या सारख्या क्रमांकांसाठी ५० हजार रुपये द्यावे लागणार आहेत. ०१२३ क्रमांकाची किंमत २० हजार एवढी करण्यात आली आहे. तसेच इतर कोणत्याही वेगळ्या क्रमांकासाठी १० हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

किंमती किती रुपयांनी वाढल्या?

दरम्यान, ०००१ क्रमांकाची पूर्वीची किंमत २.५ लाख रुपये होती. ही किंमत आता ५ लाख रुपये करण्यात आली आहे. ०००२ ते ०००९ या क्रमांकाची किंमत आधी २५,००० रुपये होती आणि आता २ लाख रुपये करण्यात आली आहे. ००१० ते ००९९ या क्रमांकांचे शुल्क १२,५०० रुपयांवरून १ लाख करण्यात आले आहे. इतर फॅन्सी नंबर ज्यांची किंमत पूर्वी ५ हजार रुपये होती आता त्यांची किंमत १० ते २० हजार करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fancy vehicle number plate news big hike in fancy number plate rates in punjab gkt