कार्यकर्त्यांचा जयघोष आणि वाद्यांचा ढणढणाट या पाश्र्वभूमीवर कर्नाटकातील अनेक दिग्गजांनी सोमवारी आपापल्या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वर आणि काँग्रेसचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांचा समावेश आहे. कर्नाटक विधानसभेसाठी ५ मे रोजी निवडणूक होणार आहे.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ एप्रिल आहे. मात्र, सोमवारी चांगला दिवस असल्याने अनेक दिग्गजांनी सोमवारचा मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केला. खाण भ्रष्टाचाराचा डाग मिरवत मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेले येडियुरप्पा यांनी त्यांच्या कर्नाटक जनता पक्षातर्फे शिमोगा जिल्ह्य़ातील शिकारीपुरा येथून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांचे असंख्य पाठीराखे उपस्थित होते. परमेश्वर यांनी तुमकूर जिल्ह्य़ातील कोरातगेरे येथून तर सिद्धरामय्या यांनी म्हैसूर जिल्ह्य़ातील वरुणा येथून उमेदवारी अर्ज भरला. माजी मंत्री व भाजपला सोडचिठ्ठी देऊन बीएसआर काँग्रेसची स्थापना करणारे बी. श्रीरामुलू यांनी बेल्लारी (ग्रामीण) येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. येडियुरप्पा यांच्या कट्टर समर्थक असलेल्या माजी मंत्री शोभा करंदलाजे यांनी विद्यमान आमदार व संसदीय कामकाजमंत्री सुरेशकुमार यांना आव्हान देत राजाजीनगर विधानसभा मतदारसंघात अर्ज भरला. सुरेशकुमार यांनीही अर्ज दाखल करून कडव्या झुंजीच्या तयारीत असल्याचे संकेत दिले. माजी मुख्यमंत्री व जनता दलाचे (सेक्युलर) नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी चन्नपाटण येथून उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान, प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री रक्षिता प्रेम यांनी बीएसआर काँग्रेसला रामराम ठोकत सोमवारी जनता दलात प्रवेश केला. त्यांनी कामराजनगर येथून उमेदवारी अर्ज भरला. रक्षिता यांनी निरपेक्ष भावनेने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे देवेगौडा यांनी स्पष्ट केले.

Story img Loader