अयोध्येमध्ये आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या सोहळ्याची एकच चर्चा रंगली आहे. सामान्य जनतेपासून ते कलाविश्वातील सेलिब्रिटींपर्यंत अनेक जणांमध्ये ही चर्चा रंगली आहे. यामध्येच अभिनेता संजय खान यांची लेक फराह खान अलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं मत व्यक्त केलं आहे. ‘माझ्यासाठी राम मंदिर आणि मस्जिद ही दोन्ही धार्मिक स्थळे सारखीच आहेत’, असं ट्विट तिने केलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर फराह खान अलीची चर्चा रंगली आहे.
एकीकडे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा उत्साह आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर या सोहळ्याला विरोध करणारे चर्चासत्र सुरु आहेत. यामध्येच फराह खान अलीचं ट्विट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
Why does supporting a Temple or a Mosque have to be choosing a side. I see both as beautiful religious monuments. Why is everything so political these days? Have we lost every inch of goodness. Why does it have to be either or? Why can’t we love and respect both equally? I do!
— Farah Khan (@FarahKhanAli) August 4, 2020
“मंदिर किंवा मस्जिद या दोघांपैकी आपल्याला एकाचीच का निवड करावी लागत आहे. मी दोघांकडे धार्मिक स्थळं म्हणूनच पाहते. आजकाल प्रत्येक गोष्टीचा राजकीय वळण मिळत आहे. आपल्याला चांगुलपणामधील एक टक्का भाग सुद्धा वाचवता आला नाही का? आपण दोन्ही धर्मांना समसमान प्रेम आणि आदर देऊ शकत नाही का?..पण मी असं करते”,असं ट्विट फराह खान अलीने केलं आहे.
दरम्यान, फराहचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जात आहे.अनेक वेळा फराह सोशल मीडियावर व्यक्त होत असते. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियाव्दारे देशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर टीकास्त्र डागलं होतं.