मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर कमलनाथ, बघेल यांची घोषणा

भोपाळ : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासांतच मध्य प्रदेशात कमलनाथ तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांनी कृषी कर्जमाफीची घोषणा केली. राजस्थानमध्ये अशोक गेहलोतही सोमवारी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. या तिन्ही शपथविधी सोहळ्यांना उपस्थित राहून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकजुटीचा संदेश दिला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत कृषी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर कमलनाथ यांनी मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कृषी कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफीच्या प्रस्तावावर कमलनाथ यांनी स्वाक्षरी केल्यानंतर शेतकरी कल्याण व कृषी विकास विभागाचे प्रधान सचिव राजेश राजोरा यांनी या संदर्भातील आदेश जारी केला.

कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आदी उपस्थित होते.

राजस्थानमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अल्बर्ट सभागृहात झालेल्या शपथविधी सोहळ्यास काँग्रेससह विरोधी पक्षांचे नेते तसेच राजस्थानच्या मावळत्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे उपस्थित होत्या.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेश बघेल यांनी शपथ घेतली. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते टी. एस. सिंह देव आणि ताम्रध्वज साहू यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. छत्तीसगडच्या बलबीर जुनेजा स्टेडियममध्ये हा सोहळा झाला. काँग्रेस नेत्यांसह छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह या वेळी उपस्थित होते. शपथविधीनंतर काही तासांतच भूपेश बघेल यांनी ६१०० कोटींच्या कृषी कर्जमाफीची घोषणा केली. दहा दिवसांत याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे बघेल यांनी सांगितले.