शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र यांच्यावर सडकून टीका केली. खैराच्या लाकडांची चोरी करणारा आणि नेपाळमध्ये खतांची तस्करी करणारा गृहमंत्री झाला, तर शेतकऱ्यांवर गाडी चढवणारा क्रांतीकारी मुलगा जन्माला येणारच, असं म्हणत टिकैत यांनी खोचक टोला लगावला. तसेच मिश्र यांच्या मुलाने मागच्या बाजूने येत शेतकऱ्यांना चिरडलं. त्याचे सर्व पुरावे व्हिडीओ स्वरुपात असल्याचंही सांगितलं. इंटरनेट सुरू झाल्यानंतर सर्व पुरावे समोर ठेऊ, असंही त्यांनी सांगितलं. ते न्यूज २४ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
राकेश टिकैत म्हणाले, “केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र खैराच्या लाकडाची चोरी करत होते. नेपाळमध्ये खतांची तस्करी करत होते. त्याच्यावर गुंडगिरीचे गुन्हे दाखल आहेत. असे लोक गृहमंत्री झाले तर मुलगा क्रांतीकारी जन्माला येणारच. ज्यांनी शेतकऱ्यांना गाडीने चिरडलं ते हल्लेखोर होते. जमाव हल्लेखोरांना मारुन टाकतात. पहिला हल्ला कुणी केला? बचावासाठी जमावाने हल्लेखोरांना मारलं असू शकतं. जेव्हा ५-६ लोकांचा मृत्यू होतो तेव्हा अशा तीव्र प्रतिक्रिया उमटतात.”
“गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा सोबतच्या लोकांना सोडून पळून गेला”
“गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा मात्र पळून गेला. तो त्याच्यासोबतच्या लोकांना सोडून पळून गेला. त्यांच्या ज्या लोकांचा मृत्यू झाला त्याविषयी आम्हाला दुःख आहे. त्यांना देखील आर्थिक मदत मिळाली पाहिजे. जेवढ्या हत्या झाल्यात त्या सर्वांचा दोष गृह राज्यमंत्री आणि त्यांच्या मुलाचा आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी मंत्र्याच्या मुलाची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवरही गाडी चालवत मारण्याचा प्रयत्न केला,” असंही टिकैत यांनी सांगितलं.
“शेतकरी आपल्या शेतातही १३ वर्षे वाट पाहतो, त्यामुळे हे आंदोलनही सोडणार नाही”
राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलन कधीपर्यंत सुरू राहिल याविषयी बोलताना सांगितलं, “शेतकरी न थकलेला आहे, न यापुढे थकेल. शेतकरी पिकाची पेरणी करतो आणि ते पिक उद्ध्वस्त होतं. अशावेळीही शेतकरी १ वर्ष वाट पाहून पुन्हा त्याच शेतात नांगर घेऊन जातो. पाऊस न आल्यास ते पिक पुन्हा वाया जातं. राजस्थानमध्ये १२ वर्षे शेतकरी नांगर घेऊन शेतात जात राहिला. नांगरणी केली, बी पेरलं, पाऊस आला नाही. अखेर १३ व्या वर्षी पाऊस आला. आम्ही शेतकरी १३ वर्षे शेतात वाट पाहतो. शेतकरी शेती सोडणार नाही, गाव सोडणार नाही किंवा हे आंदोलन देखील सोडणार नाही.”
लखीमपूर खेरी इथली घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड – शरद पवार
अजय मिश्र यांच्यावर कोणते गुन्हे दाखल
अजय मिश्र यांच्यावर तिकुनियामध्ये कलम 147, 323, 504 आणि 324 अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तिकुनियातील एका हत्याकांडातही त्यांच्यावर गंभीर आरोप होते. याच प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान त्यांच्यावर सुनावणी दरम्यानच हल्ला झाला होता. यात ते थोडक्यात बचावले. नंतर न्यायालयाने त्यांना या प्रकरणातून दोषमुक्त केलं होतं.