Prayagraj : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. करछना तहसील कार्यक्षेत्रातील इसोटा लोहागपूर गावात शनिवारी रात्री एका ३५ वर्षीय दलित शेतकऱ्याची हत्या करून मृतदेह जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर प्रयागराजमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
इसोटा गावात रविवारी सकाळी काही गावकऱ्यांना गावाबाहेरील एका बागेत एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर चौकशी केली असता त्याच गावातील अशोक कुमार यांचा मृतदेह असल्याची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी पंचनामा करत अधिक चौकशी सुरु केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती सांगितली जात आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्न उद्धभवू नये म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच या घटनेतील आरोपींना अटक करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.
या घटनेबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, शनिवारी रात्री शंकरकडे आरोपींपैकी एक दिलीप सिंग (२८) त्याच्या घरी आला आणि त्याला शेतात सामान वाहून नेण्यासाठी सोबत घेऊन गेला होता. मात्र, त्यानंतर रविवारी सकाळी शंकरचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. तसेच पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत एका महिलेच्याबाबत झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण गळा दाबून मारण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
देवी शंकर यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सात जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शंकर यांच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, “दिलीप सिंग नामक व्यक्ती रात्री १०:३० च्या सुमारास त्यांच्या घरी आला आणि देवी शंकरला सोबत घेऊन गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ५:३० च्या सुमारास आम्हाला कळलं की माझ्या मुलाला जाळण्यात आलं आहे. नंतर आरोपी आमच्या घरी परतले आणि त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली आणि आम्हाला धमकावलं”, असा दावाही त्यांनी केली
प्रयागराजचे पोलीस उपायुक्त विवेक चंद्र यादव यांनी म्हटलं की, तपास यंत्रणा ताब्यात घेतलेल्यांची चौकशी करत आहेत आणि स्थानिक रहिवाशांचे जबाब नोंदवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच पोलिसांना एफआयआरमध्ये नाव असलेल्या दोघांचा आणि तक्रारीत उल्लेख नसलेल्या दोघांचा सहभाग आढळला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तपासात नेमकं काय आढळलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान असं आढळून आलं की, शेतात काम पूर्ण केल्यानंतर आरोपी आणि देवी शंकर यांनी शेजारच्या बागेत दारू प्यायली. घटनास्थळावरून दारूची बाटली जप्त करण्यात आली आहे. दारू पित असताना एका स्थानिक महिलेवरून त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात आरोपीने देवी शंकर यांच्या डोक्यावर विटेने वार केले आणि नंतर गळा दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि ओळख लपवण्यासाठी मृतदेह जाळून टाकला आणि नंतर आरोपी तेथून पळून गेला”, अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आल्याचं पोलिसांनी म्हटलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.