तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यासाठी मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मुक्काम ठोकत आंदोलन सुरू केलं आहे. सरकारसोबतची चर्चा वारंवार फिस्कटल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे. तर दुसरीकडे आता काही शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करू नये, अशी मागणी करत कायदे रद्द केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू असतानाच हरयाणातील २९ शेतकऱ्यांच्या संघटनाच्या शिष्टमंडळानं नव्या कायद्यांना समर्थन दिलं आहे. या प्रतिनिधींनी शनिवारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. भारतीय किसान युनियनचे नेते गुणी प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांना तिन्ही कृषी कायद्यांना समर्थन देणारं पत्र दिलं आहे.

“जर नवीन कृषी कायदे रद्द केले, तर आम्ही आंदोलन करू. आम्ही सगळ्या जिल्ह्यांना माहिती दिली आहे. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आम्हालाही आहे, त्यामुळे आम्ही आंदोलन करू. आमचा तिन्ही कायद्यांना पाठिंबा आहे. सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेस, डावे पक्ष आणि हिंसक लोक करत आहेत. या आंदोलनानं राजकीय स्वरूप घेतलं आहे. या तिन्ही कायद्यांमुळे शेतकऱ्यांना खरं स्वातंत्र्य मिळेल,” असं म्हणत प्रकाश यांनी या कायद्यांना पाठिंबा दिला आहे.

दिल्लीत काय सुरू आहे

नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन तीव्र आणि देशव्यापी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला असून, रविवारी सकाळी ‘चलो दिल्ली’ आंदोलन करण्यात आलं. सोमवारी प्रमुख शेतकरी नेते उपोषण करणार आहेत. “आम्ही सरकारशी चर्चेस तयार आहोत; मात्र आधी तिन्ही नवे कृषी कायदे रद्द करण्याबाबत चर्चा होईल,” असे शेतकऱ्यांच्या नेत्यांनी शनिवारी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers group threaten demonstrations if canceled met tomar in support of agricultural laws bmh