उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या निमित्ताने सुरु झालेल्या राजकीय रणसंग्रामात ‘अब्बा जान’ नंतर आता ‘चाचाजान’ची एंट्री झाली आहे. कारण, बागपतमध्ये दाखल झालेल्या भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी आता एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी, राकेश टिकैत यांनी ओवैसी यांचा उल्लेख भाजपाचे ‘चाचाजान’ असा केला आहे. “भाजपाचे ‘चाचाजान’ ओवेसी आता उत्तर प्रदेशात आले आहेत. तेच भाजपाला विजयाकडे घेऊन जातील. आता काहीच अडचण नाही”, असा टोला यावेळी राकेश टिकैत यांनी लगावला आहे.

“भाजपाचे चाचाजान असदुद्दीन ओवेसी उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. त्यामुळे, त्यांनी (ओवेसींनी) त्यांच्यावर (भाजपाला) अत्यंत कठोर शब्दांत जरी टीका केली तरीही त्यांच्यावर (ओवेसींवर) कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही. कारण, ते दोघेही एकच टीम आहेत”, अशी थेट टीका राकेश टिकैत यांनी यावेळी केली आहे. राकेश टिकैत हे मंगळवारी (१४ सप्टेंबर) बागपतच्या टटीरी गावात शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी टिकैत यांनी ओवैसी आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आलेल्या राकेश टिकैत यांनी यावेळी विजेचे दर आणि एमएसपीसंदर्भात (MSP) निवेदनही दिलं. यावेळी टिकैत म्हणाले की, “देशातील सर्वात महाग वीज यूपीमध्येच आहे.” पुढे टिकैत म्हणाले की, “शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य हमीभाव मिळत नाही. उसासाठी किमान आधारभूत किंमत ही ६५० रुपये प्रति क्विंटल असायला हवी.”

MSP मध्ये मोठा घोटाळा! टिकैत यांचा आरोप

राकेश टिकैत म्हणाले की, “सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि एमएसपीची हमी द्यावी यासाठी आम्ही दिल्लीत धरणं धरून बसलो आहोत. त्यात आता हे देखील समोर येत आहे की, MSP मध्ये मोठा घोटाळा होत आहे. सरकार, अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या मदतीने धान्य आणि गव्हाच्या शासकीय खरेदीमध्ये प्रति क्विंटल ४०० ते ५०० रुपयांचा फरक आहे. रामपूरमध्ये ११ हजार बनावट शेतकऱ्यांनी हे धान्य खरेदी करून पुढे ते काही व्यापाऱ्यांना विकले आहे.”

Story img Loader