कुरुक्षेत्र : सूर्यफुलाच्या पिकाला किमान आधारभूत किंमत मिळावी या मागणीसाठी हरियाणातील शेतकऱ्यांनी सोमवारी महापंचायत भरवली आणि दिल्ली-चंडीगड महामार्गावर ‘चक्का जाम’ केले. विविध खाप पंचायती आणि भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकैत यांच्यासह कुस्तीगीर बजरंग पुनियादेखील यामध्ये सहभागी झाला. ‘एमएसपी दिलाओ, किसान बचाओ’ अशी घोषणा देत ही महापंचायत आयोजित करण्यात आली.
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शनिवारी साडेआठ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना सूर्यफूल तेलबियांसाठी २९ कोटी १३ लाख रुपये अंतरिम रक्कम जारी केली. मात्र राज्य सरकारने ६ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल या दराने पीक खरेदी करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. एमएसपीपेक्षा कमी दराने विकल्या गेलेल्या सूर्यफूलास ‘भावांतर भरपाई योजने’अंतर्गत राज्य सरकार प्रतिक्विंटल १ हजार रुपये अंतरिम आधारभूत रक्कम देत आहे.