नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवरील पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांचे आंदोलन बुधवारी आणखी चिघळले. खनौरी येथे झालेल्या हिंसाचारात एका तरुण आंदोलकाचा मृत्यू झाला तर १२ पोलीस जखमी झाले आहेत. सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंसाचार उफाळला. आंदोलकांना रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला, तर आंदोलकांनी मिरचीची पूड जाळल्यामुळे अनेक पोलिसांना त्रास झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> सप’काँग्रेस आघाडीवर शिक्कामोर्तब ; उत्तर प्रदेशात काँग्रेस १७ जागांवर लढणार; दिल्लीत, तमिळनाडूत इंडिया आघाडीत चर्चेला गती

रविवारी रात्री सरकारबरोबर चर्चेची चौथी फेरी निष्फळ ठरल्यानंतर बुधवारी शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा ‘चलो दिल्ली’ आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार सकाळी ट्रॅक्टर, उत्खनक, ट्रक अशा वाहनांसह शंभू, खनौरी आदी सीमांवर तळ ठोकलेल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केले. दिल्ली पोलिसांनी उभारलेली तटबंदी मोडून आंदोलकांनी राजधानीत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी खनौरी सीमेवर हरियाणा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अश्रुधुराचा मारा केला, तसेच रबरी गोळ्यांच्या फैरीही झाडण्यात आल्या. आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमकही झाली. यात सुभकरण सिंग (२१) या तरुणाचा मृत्यू झाला. तो पंजाबच्या भटिंडा जिल्ह्यातील बलोक गावचा रहिवासी होता. शेतकरी नेते बलदेव सिंग सिरसा यांनी याला दुजरो दिला आहे. १३ फेब्रुवारीला ‘दिल्ली चलो’ आंदोलन सुरू झाल्यानंतरचा हा पहिला बळी आहे. पटियालास्थित राजिंद्र रुग्णालयाचे वैद्याकीय अधिष्ठाता एच. एस. रेखी यांनी दिलेल्या माहितीनुसार सुभकरण याच्या डोक्याला इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. अन्य दोघे जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रेखी यांनी दिली.

पंजाब-हरियाणामध्ये वाद

शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने ‘आप’ची सत्ता असलेला पंजाब आणि भाजपशासित हरियाणा या दोन राज्यांमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. हरियाणा पोलिसांनी पंजाबच्या हद्दीत येऊन कारवाई केल्याचा आरोप अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी केला आहे. आंदोलकाच्या मृत्यूवरून पंजाबमधील भाजपेतर पक्षांनी हरियाणा पोलिसांवर टीकेची झोड उठविली. दुसरीकडे आंदोलकांकडे असलेले ट्रॅक्टर, उत्खनक आदी साहित्य जप्त करण्याची विनंती मंगळवारी पंजाब पोलिसांना केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले, असा दावा हरियाणा पोलिसांनी केला.

आंदोलन दोन दिवस स्थगित

खनौरी सीमेवर उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते सरवनसिंग पांढेर यांनी आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करीत असल्याची घोषणा केली. शुक्रवारी संध्याकाळी आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असे त्यांनी बुधवारी रात्री उशिरा जाहीर केले. तर शंभू सीमेवर आंदोलकांना संबोधित करताना शेतकरी नेते जगजितसिंग दालेवाल यांनीही शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले.

आम्ही मोर्चात एकाही तरुणाला पुढे पाठवलेले नाही. उलट, आम्ही नेतेच शांततेने दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून ज्या प्रकारे आमच्यावर हल्ला केला तो सर्वांनी पाहिला. आम्ही कधीही चर्चेला नकार दिला नाही. पण, अशा वातावरणात चर्चा होणे शक्य नाही.

सरवनसिंग पांढेरशेतकरी नेते

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers protest 2024 one farmers dead during protest at delhi zws
Show comments