ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठाचे संशोधन
परग्रहावर शेती करता येऊ शकेल काय याचे उत्तर आता निश्चित होकारार्थी देता येईल, असे संशोधन ऑस्ट्रेलियातील वैज्ञानिकांनी केले आहे. त्यांनी तंबाखूवर्गातील प्राचीन वनस्पतीमध्ये असलेले असे जनुक शोधले आहे की, त्याचा वापर करून मंगळासारख्या दूरच्या ग्रहावरही प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकणारी पिके व इतर वनस्पती आंतरजनुकीय तंत्राने तयार करणे शक्य होणार आहे, असा वैज्ञानिकांना विश्वास वाटतो.
क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठातील वनस्पती जनुकशास्त्राज्ञ प्रा. पीटर वॉटरहाऊस यांनी सांगितले की, मूळ आदिवासी जमातींमध्ये प्रचलित असलेल्या तंबाखूच्या एका देशी रोपात म्हणजे निकोटियाना बेनथामियाना या पिटज्युरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीत हे जनुक सापडले आहे. पिटज्युरी ही तंबाखू वनस्पती आहे, तिचा इतिहास शोधताना हे जनुक सापडले आहे. या वनस्पतीचा उपयोग जनुकशास्त्रज्ञ विषाणू व लशीची चाचणी घेण्यासाठी प्रारूप म्हणून करीत असतात.
वनस्पतींमधील पांढरा उंदीर म्हणजे ज्याच्यावर प्रयोग केले जातात असा जैविक घटक असे या वनस्पतीला म्हणावे लागेल. या वनस्पतीत अनेक आश्चर्यकारक गुण असल्याचे दिसून आले आहे. या वनस्पतीचा जनुकीय आराखडा तयार केला आहे. ही वनस्पती पश्चिम ऑस्ट्रेलिया व उत्तर सीमेकडील असल्याचे सांगण्यात येते. रेणवीय घड्याळाच्या व जीवाश्म नोंदीच्या आधारे वैज्ञानिकांनी या वनस्पतीचे आताचे रूप शोधून काढले आहे. साडेसात लाख वर्षांपूर्वीची ही वनस्पती असून ती जंगली स्वरूपातील होती. वनस्पती जैवतंत्रज्ञानावर मोठा परिणाम करणारे हे संशोधन असल्याचे संशोधक श्रीमती ज्युलिया बॅली यांनी सांगितले. या वनस्पतीने प्रतिकारशक्ती गमावली असली तरी ती पटकन वाढते, फुलोरा लगेच येतो व कमी पावसातही उगवते. दुष्काळातही ही वनस्पती तग धरते, त्यामुळेच इतकी वष्रे ती टिकून राहिली आहे. अवकाशात रोगमुक्त वनस्पतींच्या निर्मितीसाठी या वनस्पतीचा अभ्यास उपयुक्त आहे. अलीकडच्या ‘द माíशयन’ या चित्रपटात अवकाशवीर मंगळावर अडकून पडतो असे दाखवले आहे, मग तो त्याच्या तेथील वास्तव्यात मंगळावर बटाट्यांची लागवड करतो व तेथे गुजराण करतो, ही आता कल्पना राहणार नाही तर काही वर्षांनी मंगळासारख्या ग्रहांवरही शेती करणे शक्य होणार आहे.