Farooq Abdullah in Parliament No Confidence Motion : विरोधी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज (९ ऑगस्ट) दुसऱ्या दिवशीही जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनीही अविश्वास प्रस्तावावर मत मांडत असताना अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यांनी प्रमुख्याने काश्मीर, काश्मिरी पंडित आणि भाजपा सरकार आल्यापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये बदललेली परिस्थिती यावर भाष्य केलं. फारूख अब्दुल्ला म्हणाले, तुमच्यात दम असेल तर पाकिस्तानशी युद्ध करा.
लोकसभेत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करत फारुख अब्दुल्ला म्हणाले, वाजपेयी म्हणायचे, तुम्ही एकवेळ स्वतःला बदलू शकता, पण तुमच्या शेजाऱ्याला बदलू शकत नाही. शेजारी देशांशी मैत्री ठेवली तर दोन्ही देशांची प्रगती होते. शत्रूत्वाने कोणतेही प्रश्न सुटत नाहीत. यावर तुमचा विश्वास असो अथवा नसो. तुम्हाला इतकंच वाटत असेल तर पाकिस्तानशी लढा, त्यात तुम्हाला कोणीही अडवणार नाही.
फारूख अब्दुल्ला म्हणाले, आम्ही पाकिस्तानी नाही. आम्हाला पाकिस्तानी म्हणणं बंद करा. आणखी किती दिवस तुम्ही आमच्याकडे संशयाने पाहणार आहात? संशय बाजूला ठेवून आम्हाला मिठी मारा. आम्हीसुद्धा याच देशाबरोबर उभे आहोत. आम्हीसुद्धा या देशासाठी गोळ्या खाल्या आहेत. या देशाचा आम्ही एक भाग आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. परंतु या राष्ट्राचीसुद्धा एक जबाबदारी आहे. केवळ हिंदूंचीच जबाबदारी घेऊन चालणार नाही, मुस्लीम, शीख आणि ख्रिश्चनांसह सर्वधर्मीयांची जबाबदारी घ्यावी लागेल.
हे ही वाचा >> मणिपूरमधील हिंसाचारामागचं कारण काय? लोकसभेत अमित शाहांनी सांगितला २०२१ पासूनचा घटनाक्रम, म्हणाले…
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला म्हणाले, पंतप्रधान केवळ एका रंगाचं प्रतिनिधित्व करत नाहीत. ते संपूर्ण भारताचं नेतृत्व करतात. तुम्ही (केंद्र सरकार) गेल्या १० वर्षात किती काश्मिरी पंडितांना परत आणलंत? असं म्हणू नका की आम्ही या राष्ट्राचा भाग नाही, आम्हीसुद्धा या राष्ट्राचा एक अविभाज्य भाग आहोत.