जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांची केलेली हत्या आणि पाकिस्तानसोबत चर्चेबाबत प्रश्न विचारला असता ते संतापलेले दिसले. “सरकार म्हणतं सर्वकाही व्यवस्थित आहे. मात्र, पोलिसांचेच जीव सुरक्षित नाहीत, तिथं सामान्य माणूस कसा सुरक्षित असेल?” असा सवाल त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला विचारला आहे. तसेच चीनच्या घुसखोरीचा मुद्दा उपस्थित सरकार संसदेत यावर चर्चा करणार का? अशीही विचारणा केली. शुक्रवारी (१० डिसेंबर) काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी २ पोलिसांची हत्या केली. यावर प्रतिक्रिया देताना फारुख अब्दुल्ला बोलत होते.
फारुख अब्दुल्ला म्हणाले, “लोकांची हत्या होत आहे ही खूप दुःखद घटना आहे. सगळं व्यवस्थित आहे असं सांगणाऱ्या सरकारला प्रश्न विचारले पाहिजे. हे सर्व व्यवस्थित आहे का? नागरिक सुरक्षित आहेत का? जेव्हा काश्मीरमध्ये पोलीस सुरक्षित नाहीत, तेव्हा सामान्य माणूस सुरक्षित कसा असेल?”
हेही वाचा : “जम्मूवर अन्याय होण्याचे दिवस संपले, आता कुणीही…”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली भूमिका!
“सरकार चीनच्या घुसखोरीवर संसदेत चर्चा करेल का?”
अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत चर्चा होऊ शकते का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता यालाही फारुख अब्दुल्ला यांनी उत्तर दिलं. “तुम्हाला बोलावंच लागेल. चर्चेला दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नाही. सरकार चीनसोबत बोलू शकतं, मग त्यावर काय बोलाल? चीन भारतात घुसखोरी करत आहे. ते भारताच्या जमिनीवर कब्जा करत आहेत. त्यांनी भारताच्या हद्दीत त्यांची घरं बांधली आहेत. सरकार चीन काय करतंय हे समजून घेण्यासाठी यावर संसदेत चर्चा करेल का?” असा प्रश्न फारुख अब्दुल्ला यांनी विचारला.