जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे मोठी मागणी केली आहे. ‘काश्मीर फाईल’ चित्रपटामुळे संपूर्ण देशात द्वेष निर्माण होत आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांवरील हल्ले रोखायचे असतील तर सरकारने काश्मीर फाईल्स चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. यावेळी फारूक अब्दुल्ला यांनी या चित्रपटातील एका दृष्यावर आक्षेपही घेतला. एक मुस्लीम व्यक्ती हिंदूची हत्या करून त्याचं रक्त तांदळात टाकतो आणि पत्नीला खा म्हणतो असं होऊ शकतं का? असा सवाल त्यांनी केला.

फारूक अब्दुल्ला म्हणाले, “काश्मिरी पंडितांवरील हल्ले रोखायचे असतील तर सरकारने ‘काश्मीर फाईल्स’वर बंदी घालायला हवी. देशातील मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवला जात आहे. त्यामुळेच काश्मिरमधील मुस्लिम युवकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. काश्मीर फाईल्स चित्रपट खरा आहे का? असा प्रश्न मी सरकारला विचारला आहे. काश्मीर फाईल्स हा कोणताही आधार नसलेला चित्रपट असून त्याने संपूर्ण देशात द्वेष निर्माण केला.”

“एक मुस्लीम आधी हिंदूची हत्या करून त्याचं रक्त तांदळात टाकतो आणि…”

“एक मुस्लीम व्यक्ती आधी एका हिंदूची हत्या करतो. त्यानंतर त्याचं रक्त तांदळात टाकतो आणि पत्नीला आता हे तू खा असं म्हणू शकतो का? आपण इतक्या खालच्या पातळीवर गेलो आहोत का?” असा सवालही फारूक अब्दुल्ला यांनी विचारला. मागील काही दिवसांमध्ये काश्मीर पंडितांवरील हल्ल्यांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यानंतर काश्मिरी पंडितांच्या घरांबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा : चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार

लष्कर-ए-इस्लामकडून काश्मिरी पंडितांना धमकी

काश्मीर खोऱ्यात लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेकडून काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडण्यास सांगण्यात आलंय. तसं न केल्यास मरण्यास तयार रहा अशी धमकी दहशतवाद्यांनी दिली आहे. “ज्या काश्मिरी पंडितांना काश्मीरच्या रुपात आणखी एक इस्राईल हवंय आणि काश्मीरमधील मुस्लिमांना मारायचं आहे त्यांच्यासाठी येथे कोणतीही जागा नाही. तुमची सुरक्षा कितीही कडक करा, तुमची ‘टार्गेट किलिंग’ होईल,” अशी धमकी देण्यात आलीय.

Story img Loader