संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काश्मीरप्रश्नी अनेकवेळा चर्चा झाली. लोकसभा आणि राज्यसभेत झालेल्या चर्चेवेळी गृहमंत्री अमित शाह यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला. अमित शाह म्हणाले, नेहरूंच्या चुकांमुळे काश्मीरला खूप काही भोगावं लागलं आहे. काश्मीर युद्धावेळी भारतीय सैन्य जिंकत होतं पण पंजाबचा भाग येताच नेहरूंनी युद्धबंदी केली. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला. जो भाग आपल्याला परत कधीच मिळाला नाही. या युद्धाच्या सुरुवातीला नेहरू काश्मीरमध्ये सैन्य पाठवण्याचा निर्णय घेत नव्हते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर नेहरूंनी सैन्य पाठवलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान अमित शाह यांच्या टीकेला नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी उत्तर दिलं आहे. अब्दुल्ला यांनी काही वेळापूर्वी एनडीटीव्हीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, हे लोक (भाजपा) नेहमी जुनं रडगाणं गात असतात. पंडित नेहरूंवर टीका करत असतात. ते म्हणतात पंडित नेहरूंनी ७० वर्षांमध्ये काहीच केलं नाही. आज जे चांद्रयान आपण पाठवलंय त्याची सुरुवात कोणी केली? कोणी या सगळ्याचा पाया रचला? अणूऊर्जा कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली? जवाहरलाल नेहरूंनी केली.

फारूख अब्दुल्ला म्हणाले, नेहरूंच्या चुकांमुळे पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात आला नाही, असं ते म्हणतायत. परंतु, हे असत्य आहे. तुम्ही एकदा सरदार वल्लभभाई पटेल यांचं पत्र पाहा. ते आजारी असताना देहरादून येथे होते. तेव्हा त्यांनी गोपाल स्वामी अयंगार यांच्यासाह काही लोकांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात पटेल यांनी म्हटलं होतं की, जास्त काळ इथे टिकण्यासाठी आमच्याकडे संसाधने नाहीत. त्यामुळे आम्ही अधिक काळ ही लढाई चालू ठेवू शकत नाही. यासाठी आपण जवाहरलाल नेहरूंना जबाबदार ठरवू शकत नाही.

कलम ३७० परत आणण्यासाठी आम्हाला २०० वर्षे लागतील : अब्दुल्ला

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं संविधानातील ‘कलम ३७०’ रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घटनात्मकदृष्टया वैध असल्याचा निर्वाळा सोमवारी (११ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिला. याबाबतही अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली. अब्दुल्ला म्हणाले, याच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी यापूर्वी निकाल दिला होता की कलम ३७० कायमस्वरुपी आहे. पण आता ते रद्द झालंय. ठीक आहे, बघू पुढे काय होतंय. विश्वासावर हे जग उभं आहे. हे दिवसही जातील. यांना कलम ३७० हटवण्यासाठी ७० वर्षे लागली. ते परत आणण्यासाठी कदाचित आम्हाला २०० वर्षे लागतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farooq abdullah says jawaharlal nehru was not responsible for pok asc