Farooq Abdullah on Ganderbal Terrorist Attack : गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. दहशतवादी व भारतीय लष्करामध्ये चकमकीच्या घटनाही समोर घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी दोन जवानाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी गोळीबार करत सात स्थलांतरित नागरिकांच्या हत्या केल्या आहेत. या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी या घटनेचा व पाकिस्तानचा निषेध नोंदवला आहे.

गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी रविवारी (२० ऑक्टोबर) काही स्थलांतरित नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच एका डॉक्टरचीही हत्या करण्यात आली आहे. या दहशतवादी हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचं वृत्तही समोर आलं आहे. हे मजूर बोगद्याच्या प्रकल्पात काम करत होते. काम करत असतानाच हा हल्ला झाला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, “ही खूप दुर्दैवी घटना आहे. अनेक गरीब मजूर कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी काही पैसे कमावण्याच्या आशेने काश्मीरमध्ये येतात. त्या गरिबांना दहशतवाद्यांनी शहीद केलं आहे. काश्मिरी लोकांची सेवा करणारे एक डॉक्टर या हल्ल्यात मारले गेले आहेत”.

हे ही वाचा >> Supreme Court : मोठी बातमी! राज्य घटनेतील ‘हिंदुत्व’ हा शब्द बदलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

फारुख अब्दुल्ला काय म्हणाले?

फारुख अब्दुल्ला म्हणाले, “या क्रूर हैवानांना त्या गरीब बिचाऱ्या मजुरांना मारून काय मिळणार आहे? अशा हत्या करून काश्मीरचा पाकिस्तान करता येईल असं त्यांना वाटतंय का? अनेक वर्षांपासून लोक येथे येत आहेत. हा तणाव मिटावा असं आम्हाला वाटतं. आपण या कठीण परिस्थितीतून बाहेर पडू. मात्र, मला पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना सांगायचं आहे की त्यांना खरोखर भारताशी चांगले संबंध हवे असतील तर ही असली कृत्ये त्यांना थांबवावी लागतील. काश्मीर पाकिस्तान होणार नाही, होणार नाही, होणार नाही.

हे ही वाचा >> Rohini Blast : दिल्लीतील स्फोटामागे खलिस्तानी समर्थकांचा गट? टेलिग्राम चॅनेलवरील व्हिडिओमुळे खळबळ!

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री पाकिस्तानला उद्देशून म्हणाले, “काश्मीरच्या प्रतिष्ठेला कोणीही धक्का लावू नये. कृपा करून आमच्या काश्मीरचाही विकास होऊ द्या. तुम्ही अजून किती दिवस हल्ले करत राहणार? १९४७ पासून तुम्ही लोकांनी हा हिंसाचार सुरू केला, जो आजही चालू आहे. निष्पाप लोकांना मारलंत, एवढं सगळं करून काश्मीरचा पाकिस्तान झाला का? गेल्या ७५ वर्षांत टोकाचा हिंसाचार करून काश्मीरचा पाकिस्तान झाला नाही तर आज कसा काय बनेल? तुम्ही लोक तुमचा देश बघा. आमच्या लोकांची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. आम्हाला आमचं नशीब बदलायचं आहे.