नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि खासदार फारूख अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्यावर भाष्य केलं आहे. दोन्ही देशांनी आपसात असलेले वाद मिटवण्यासाठी संवाद साधायला हवा, असं म्हणत अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आपण पाकिस्तानशी चर्चा का करत नाही, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी अब्दुल्ला यांनी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या पाकिस्तानविषयीच्या भूमिकेचा आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडच्या एका वक्तव्याचा उल्लेख करत मोदी यांना पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फारूख अब्दुल्ला म्हणाले, मी नेहमीच म्हटलं आहे की भारत आणि पाकिस्तानमधले वाद हे चर्चेतूनच मिटतील. अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, ‘आपण मित्र बदलू शकतो. परंतु, आपल्याला आपला शेजारी बदलता येत नाही.’ शेजाऱ्यांशी मैत्री ठेवली तर दोघांचीही प्रगती होईल. हे शत्रूत्व कायम राहिलं तर दोघेही मागे पडू. मागे एकदा नरेंद्र मोदी म्हणाले होते, युद्ध हा आता पर्याय असू शकत नाही. आम्ही बातचीत करून प्रश्न मार्गी लावू. परंतु, आपण त्यांच्याशी (पाकिस्तान) चर्चा करतोय का? मला दोन्ही देशांमध्ये चर्चा होताना दिसत नाही.

भारत आणि पाकिस्तानमध्ये कुठलीही चर्चा होत नाहीये, असं म्हणत फारूख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदी यांना काश्मीरबाबत इशारा दिला आहे. अब्दुल्ला म्हणाले, आता नवाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान होणार आहेत. आधी इम्रान खान होते. इम्रान खान भारताशी चर्चा करण्यास तयार होते, शरीफही चर्चेस तयारर आहेत. परतु, आपण त्यांच्याशी चर्चा करत नाही. त्याचं कारण काय? आपण चर्चेतून प्रश्न सोडवले नाहीत तर….मला माफ करा, परंतु, आमचीसुद्धा गाझातल्या लोकांसारखी स्थिती होईल. काश्मीरची अवस्था गाझा किंवा पॅलेस्टाईनसारखी होईल. इस्रायल सातत्याने गाझावर बॉम्बवर्षाव करत आहे, आपल्याकडेही तेच होईल.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, “पडित नेहरूंच्या चुकांमुळे काश्मीर आपल्या हातून निसटलं. काश्मीर युद्धावेळी भारतीय सैन्य जिंकत होतं पण पंजाबचा भाग येताच जवाहरलाल नेहरू यांनी युद्धबंदी केली. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला. तो भाग आपल्याला परत कधीच मिळाला नाही.” शाह यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना फारूख अब्दुल्ला म्हणाले, हे असत्य आहे. तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांनी देहरादून येथून लिहिलेलं एक पत्र पाहा. पटेल तेव्हा आजारी होते. त्यांनी गोपाल स्वामी अयंगार यांच्यासाह काही लोकांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात पटेल यांनी म्हटलं होतं की, जास्त काळ इथे टिकण्यासाठी आमच्याकडे संसाधने नाहीत. त्यामुळे आम्ही फार काळ ही लढाई चालू ठेवू शकत नाही. यासाठी आपण जवाहरलाल नेहरूंना जबाबदार ठरवू शकत नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farooq abdullah says kashmir will become gaza if no dialogue between india and pakistan asc