ATM heist in kerala: हॉलिवूडचा ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ चित्रपट, त्यातील विन डिझेल आणि त्याच्या सहकाऱ्यांचे स्टंट जगभरातील चित्रपट चाहत्यांना आवडतात. स्पोर्ट्स कार, त्याचा वेग आणि चोरीचा थरार हा या चित्रपटातील मुख्य भाग असतो. भारतातही काही चोरांनी ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ चित्रपटाला शोभेल अशी चोरी करण्याचा प्रयत्न केला. सात चोर, तीन राज्य, तीन एटीएम मशीन, ट्रक, ६५ लाखांचा मुद्देमाल आणि ७ तासांचा पाठलाग असा या चोरीचा घटनाक्रम आहे. पाठलाग करताना चकमक झाल्यामुळे सात चोरांपैकी एकाचा मृत्यू झाला असून इतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कशी झाली चोरी?

शुक्रवारी रात्री २.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास केरळच्या त्रिसुर जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तीन एटीएम फोडून ६५ लाखांची रोकट लुटण्यात आली. एटीएममधील सीसीटीव्हीला स्प्रे पेंटने नादुरूस्त केल्यानंतर गॅस कटरने एटीएम मशीन फोडण्यात आल्या. एटीएम लुटले गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता चोर पांढऱ्या रंगाच्या क्रेटा गाडीतून पळाल्याचे दिसले. त्रिसुर-कोईम्बतूर महामार्गावर गाडी गेल्याचे दिसले, पण त्यानंतर सदर गाडीचा कोणताही पत्ता लागला नाही.

केरळ पोलिसांनी बारकाईने तपास केल्यानंतर समजले की, महामार्गावर जिथे क्रेटा गाडी दिसेनाशी झाली, तिथून एक मोठा कन्टेनर अचानक महामार्गावर दिसून आला. हा योगायोग पाहता पोलिसांना कन्टेनरवर संशय आला. पण तोपर्यंत सदर कन्टेनर तमिळनाडूच्या हद्दीत पोहोचला होता. त्यामुळे केरळ पोलिसांनी तमिळनाडू पोलिसांना याची माहिती दिली. तमिळनाडू पोलिसांनीही राज्यभरातील सर्व जिह्यात ही माहिती देऊन कन्टेनरचा शोध घेण्याचे आदेश दिले.

तमिळनाडू पोलिसांनी असं पकडलं

सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नमक्कल येथे नाकाबंदी केलेल्या ठिकाणी सदर कंटेनर दिसून आला. पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर कंटेनरने नाकांबदी तोडून पळ काढला. यानंतर पोलिसांनी जवळपास १२ किमीपर्यंत त्यांचा पाठलाग केला. पण कंटेनरमधील लोकांनी दगडफेक केल्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. ज्यामध्ये कंटेनर चालकाचा मृत्यू झाला आणि एका व्यक्तीच्या पायला गोळी लागली. कंटेनरचा तपास केल्यानंतर चालकाच्या केबिनमध्ये पाच जण आणि मागे क्रेटा गाडीत दोन जण बसल्याचे आढळून आले. याच गाडीत ६५ लाखांची रोकडही आढळून आली.

चोरांना जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, याच प्रकारच्या चोऱ्या मागच्या काळात तमिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकमध्ये घडलेल्या आहेत. ही चोरांची गँग हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील असून ते अशाचप्रकारे एटीएम फोडून पोबारा करत होते. सदर चोरीत पकडला गेलेला कंटेनर राजस्थानमधून भाड्याने घेण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fast and furious atm heist tamil nadu police crack daring robbery in 7 hours kvg
Show comments