आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन, आयएनएस सुमित्राला राष्ट्रपतींच्या युद्धनौकेचा सन्मान
भारतीय नौदलातर्फे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनासाठी (आयएफआर) ५३ देशांच्या ९० युद्धनौका येथील नौदल बंदरात दाखल झाल्या आहेत. भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्रा, आयएनएस सुमेधा, आयएनएस शरयू, आयएनएस सुनयना या चार अतिवेगवान गस्तीनौकांचा ताफा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे. यातील आयएनएस सुमित्राला राष्ट्रपतींच्या युद्धनौकेचा सन्मान लाभणार असून या युद्धनौकेवरूनच राष्ट्रपती मानवंदना स्वीकारतील.
आयएफआर २०१६ साठीची रंगीत तालीम बुधवारी विशाखापट्टणम बंदरापासून आतमध्ये खोल समुद्रात पार पडली. नौदलाच्या पूर्व मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल सतीश सोनी यांनी रंगीत तालिमेचे पुनरिक्षण केले. एकूण ९० युद्धनौका, सहा रांगांमध्ये उभ्या करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्ष ६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींना मानवंदना देण्यासाठी या युद्धनौका याच रचनेमध्ये उभ्या असतील. प्रत्येक रांगेतून मानवंदना स्वीकारत राष्ट्रपतींचा वेगवान गस्तीनौकांचा ताफा पुढे सरकेल. राष्ट्रपतींची नौका समोर येताच नौदलाची टोपी उंचावून ‘राष्ट्रपती की जय’ असे म्हणत त्यांना मानवंदना दिली जाईल, तर युद्धनौकेचा कप्तान त्यांना कडक सॅल्यूट करेल.
सध्या येथे येऊन दाखल झालेल्या नौदलांमध्ये अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन, ओमान, श्रीलंका, बांग्लादेश, ब्राझील, मालदीव, मॉरिशस व ऑस्ट्रेलिया आदींचा समावेश आहे. अमेरिकेचे नौदल त्यांच्या १० हजार टन वजनाची मिसाईल गायडेड क्रुझर युद्धनौका यूएसएस अँटिएटमसह दाखल झाले आहे.
आयएफआरच्या अखेरच्या टप्प्यात भारतीय नौदल व तटरक्षक दलाच्या हवाई विभागातर्फे सादर होणाऱ्या हवाई कवायतींचेही विशेष आकर्षण असणार आहे. यात सहभागी होणाऱ्या ३० विमानांमध्ये चेतक, कमोव्ह, सिकिंग, कमी वजनाचे अतिप्रगत हेलिकॉप्टर ध्रुव इल्युसिन ३८, डॉíनअर, बोईंग पोसेडिऑन पी ८१ यांचा समावेश असेल; तर नौदलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यातील सी हेरिअर, मिग २९ के आणि हॉकही सहभागी होतील. ध्रुवतर्फे समुद्रालगत केल्या जाणाऱ्या कसरती व हॉकतर्फे सादर होणाऱ्या कसरती नाटय़मय असतील.
६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता राष्ट्रपतींचे आगमन होईल, तेव्हा त्यांना २१ तोफांची सलामी देण्यात येईल. त्यानंतर राष्ट्रपतींची युद्धनौका असलेल्या आयएनएस सुमित्रावरून ते मानवंदना स्वीकारतील. त्यावेळेस लष्कर, हवाई दल व नौदल या तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षणमंत्री, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू त्यांच्यासोबत असतील.

विराट व विक्रमादित्य प्रथमच एकत्र
भारतीय नौदलातील दोन्ही विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य व आयएनएस विराट या निमित्ताने प्रथमच एकत्र पाहायला मिळतील. याशिवाय कोलकाता वर्गातील अद्ययावत स्टेल्थ विनाशिका, दिल्ली वर्गातील विनाशिका, स्टेल्थ फ्रिगेटस्, मिसाईल कॉव्‍‌र्हेटस्, पाणबुडीविरोधी युद्धनौका, जमिनीलगत कारवाई करणाऱ्या शार्दूल वर्गातील लँिडग युद्धनौकांबरोबरच किलो व सिंधुघोष वर्गातील पाणबुडय़ाही आयएफआरमध्ये भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व करतील. मात्र सर्वाचे आकर्षण ठरल्या आहेत त्या आयएनएस विराट व आयएनएस विक्रमादित्य या अजस्र विमानवाहू युद्धनौका.

Story img Loader