Delhi News : दिल्लीत एक धक्कादायक प्रकार घडाल्याची माहिती समोर आली आहे. विमा कंपनीकडून विम्याची रक्कम हडप करण्यासाठी एका पिता-पुत्राने मोठा कट रचला होता. मात्र, पोलिसांना संशय आल्यामुळे विमा फसवणुकीची घटना उघडकीस आली. वडील आणि मुलगा असं दोघांनी मिळून १ कोटी रुपयांचा विम्यासाठी मुलाच्या मृत्यूचं षडयंत्र रचलं. यासाठी एका वकिलानेही मदत केली. मात्र, पोलिसांमुळे ही घटना उघडकीस आली आणि सर्व प्रकार समोर आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला.
नेमकं प्रकरण काय?
दिल्लीतील एका व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी आपल्या मुलासाठी तब्बल १ कोटी रुपयांची विमा पॉलिसी खरेदी केली होती. मात्र, यानंतर ५ मार्च रोजी या मुलाच्या कुटुंबाने दावा केला की गगनचा (मुलाचा) नजफगडमध्ये रस्ते अपघात झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा त्याला एका छोट्या रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. तसेच हे सर्व खरे वाटावे म्हणून मुलाच्या वडिलांनी मुलाचे अंत्यसंस्कार देखील केले होते. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, या प्रकरणाने ११ मार्च रोजी अनपेक्षित वळण घेतलं. एका व्यक्तीने या प्रकाराबाबत नजफगड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला, तेव्हा अपघात झाला की नाही याची चौकशी पोलिसांनी केली. मात्र, अपघाताबाबत पोलिसांना कोणतेही पुरावे आढळून आले नाही. तसेच संबंधित कुटुंबाने केलेल्या दाव्याबाबतही कोणतेही ठोस पुरावे आढळले नाही. यानंतर पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली.
पोलिसांनी तपासाची चक्र फिरवताच धक्कादायक प्रकार समोर आला. अशा प्रकारचा कोणताही अपघात झाला नसल्याची माहिती समोर आली. तसेच या घटनेतील मुलाच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी मुलासाठी १ कोटी रुपयांची पॉलिसी खरेदी केली होती. हीच १ कोटी रुपयांची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी वडील आणि मुलाने मिळून हा सर्व बनाव रचला होता अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली. एवढंच नाही तर वकिलांच्या सल्यानुसार हा कट रचल्याचंही समोर आलं. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वडील आणि मुलाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.