Father Killed Daughter: निहंग शीख समुदायातील एका इसमाने गुरुवारी कथितपणे आपल्या १६ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. इतकंच नाही तर या पित्याने लेकीचा मृतदेह त्याच्या मोटरसायकलला बांधून गावभर फरपटत नेल्याचे सुद्धा समजतेय. पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील मुछाल गावात हा प्रकार घडला आहे. १६ वर्षीय अल्पवयीन लेक एक दिवस कोणालाही न कळवता घराबाहेर राहिल्याने पित्याने हे धक्कादायक पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मजुरीचे काम करणाऱ्या आरोपीने आपल्या मुलीचा मृतदेह त्याच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर टाकून घटनास्थळावरून पळ काढला व त्यानंतर तो अद्याप फरार आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. “आरोपींनी त्याच्या कुटुंबीयांना घरात डांबून ठेवले आणि त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीमुळे ते घराबाहेर पडू शकले नाहीत. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस शोध मोहीम राबवत आहेत,” असे पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
(हे ही वाचा: वंदे भारत एक्सप्रेसच्या काचा तोडून पळू लागले प्रवासी; टॉयलेटमध्ये घडलेला ‘हा’ प्रकार पाहून प्रवासी संतप्त )
आरोपीच्या वडिलांनी सांगितले की त्यांची नात बुधवारी घरातून निघून गेली होती. “आम्ही तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही. गुरुवारी दुपारी ती परत आली असता तिच्या वडिलांनी तिची विचारपूस केली. ती काही बोलली नाही.” पोलिस एफआयआरनुसार, आरोपीने धारदार शस्त्रे वापरण्यापूर्वी आपल्या मुलीवर शारीरिक हल्ला केला आणि तिची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीला चार मुली व पाच मुले आहेत. मृत तरुणी हे त्यांचे तिसरे अपत्य होते. पोलिसांनी पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, गावातील रहिवासी बलबीर सिंग यांनी दावा केला की, “आरोपी हा स्वभावाने अशांत असून किरकोळ कारणावरून तो अनेकदा आपल्या मुलांना आणि पत्नीला मारहाण करत असे. मुलगी बेपत्ता झाल्यावर तो प्रचंड भडकल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले होते.”