Andhra Pradesh Crime News: आंध्र प्रदेशामधील काकीनाडा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने स्वत:च्याच मुलांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मुलांची हत्या केल्यानंतर स्वत:चं देखील जीवन या व्यक्तीने संपवलं आहे. सदर व्यक्तीने त्याच्या दोन्ही मुलांची शैक्षणिक कामगिरी खराब असल्याच्या कारमामुळे त्यांना संपवलं आणि त्यानंतर स्वत:ही टोकाचं पाऊल उचललं. या घटनेमुळे काकीनाडा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं घटना काय घडली?

एका ३७ वर्षीय व्यक्तीने आपल्या दोन मुलांची हत्या केली. त्याच्या दोन्ही मुलांची शैक्षणिक कामगिरी खराब असल्याने त्या मुलांच्या भविष्याची चिंता लागल्याने पित्यानेच दोन्ही मुलांना संपवलं आहे. मुलांची शैक्षणिक कामगिरी पाहून निराश झालेल्या या व्यक्तीने आपल्या मुलांना बादलीभर पाण्यात बुडवून मारलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भातील वृ्त्त पीटीआयच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

३७ वर्षीय व्यक्तीची पत्नी घरी आल्यानंतर तिला हा सर्व प्रकार पाहून मोठा धक्का बसला. ती जेव्हा घरी आली तेव्हा तिला पहिल्यांदा बेडरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मुलांचा शोध घेतला असता तिची दोन्ही मुले पाण्याच्या बादलीत मृतावस्थेत आढळली. शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितलं की, त्या ३७ वर्षीय व्यक्तीने त्याच्या मुलांची शैक्षणिक कामगिरी खराब असल्याच्या कारणामधून हत्या केली. त्याला भीती होती की, मुलांनी अभ्यासात चांगली कामगिरी केली नाही तर सध्याच्या स्पर्धात्मक जगात मुलांना मोठा संघर्ष करावा लागेल आणि त्रास सहन करावा लागू शकतो. हा विचार मनात सातत्याने येत असल्याने त्याने अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती सांगितली जाते.

दरम्यान, घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आली आहे. त्यातील मजकूर तपासला जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आता या तपासासाठी फॉरेन्सिक पथके तैनात करण्यात आली आहेत आणि ही दुर्घटना नेमकी कोणत्या परिस्थितीत घडली? याचा तपास पोलीस करत आहेत.

Story img Loader