Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये पर्यटकांना घोड्यावरून घेऊन जाणारा स्थानिक सय्यद आदिल हुसेन शाह याचा देखील समावेश आहे. पहलगामच्या बेस कॅम्पवरून पर्यटकांना घोड्यावरून बैसरन पर्वत रांगामधील पॉईंट दाखविण्याचे काम तो करत होता. दरम्यान त्याच्या मृत्यूनंतर आदिलचे वडिलांच्या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा काही पर्यटकांना वाचविण्यासाठी तो थेट दहशतवाद्यांशी भिडला. त्याने दहशतवाद्याच्या हातातील बंदुक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्याला जीव गमवावा लागला. अदिल हा त्यांच्या घरातील मोठा मुलगा होता आणि त्याच्या एकट्याच्या कमाईवरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा मृत्यू झाला.

एएनआयशी बोलताना हैदर शाह म्हणाले की, “मला त्याचा आणि त्याच्या बलिदानाचा (शहादत) खूप अभिमान आहे. मी फक्त त्या अभिमानामुळेच सध्या जिवंत आहे. अन्यथा मी त्याचं तरुण्य, त्याचा चेहरा पाहून मी देखील मेलो असतो. त्याच्या शौर्यामुळे मी खूष आहे आणि माझा जीव देखील वाचला आहे. त्याने अनेक लोकांना वाचवलं, महिलांना, मुलांना वाचवलं. काही लोक त्याच्यामुळे वाचले याचा मला अभिमान आहे.”

अदिलची आईने देखील मुलाच्या मृत्यूनंतर भावना व्यक्त केल्या आहेत. “तो दिवसाला ३०० रुपये कमवायचा. आम्ही संध्याकाळी तांदुळ विकत आणायचो आणि मिळून जेवायचो. आता कोण अन्न आणणार? औषधे कोण आणणार?” असा आर्त सवाल त्यांनी उपस्थित केला. “तो त्यांना वाचवताना मृत्युमुखी पडला, पण आपण काय करू शकतो? ती देखील आपली भावंडेच आहेत,” असेही त्या पुढे बोलताना म्हणाल्या.