करोना विषाणूचा जन्म चीनमधील प्रयोगशाळेतून झाला, असा आरोप गेल्या काही वर्षात सातत्याने करण्यात आला. मात्र, याबाबत कोणतेही ठोस पुरावे अद्यापतरी मिळालेले नाहीत. दरम्यान, यासंदर्भात अमेरिकेच्या गुप्तचर तपास संस्थेचे ( FBI) संचालक क्रिस्टोफर व्रे यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. करोना विषाणूचा जन्म चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून झाल्याची दाट शक्यता असल्याचं ते म्हणाले. मंगळवारी अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – विश्लेषण : करोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली? आतापर्यंत शास्त्रज्ञांच्या हाती काय लागले?
काय म्हणाले क्रिस्टोफर व्रे?
आम्ही अमेरिकेतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध असून गेल्या काही वर्षांपासून करोनाच्या उत्पत्तीबाबत आम्ही संशोधन करत आहोत. या तपासादरम्यान आम्ही जी निरीक्षणं नोंदवली, त्यानुसार करोना विषाणूचा जन्म चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून झाल्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात कोणीही संधोधन करत असेल तर चीन सरकारकडून त्यांच्या कामात अडथळे आणले जातात, अशी प्रतिक्रिया व्रे यांनी दिली.
हेही वाचा – “मुलांनी हॉलिवुडचा चित्रपट बघितला, तर ६ महिने कारावास”, उ. कोरियाचा हुकुमशाह किम जोंगचं पालकांना अजब फर्मान!
दरम्यान, अमेरिकेच्या उर्जा विभागाने याच करोना विषाणूच्या उगमाबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. या विषाणूचा उगम चीममधील प्रयोगशाळेत झाला असून योग्य ती काळजी न घेतल्यामुळे या विषाणूचा प्रसार झाला, असं उर्जा विभागाने केलेल्या दाव्यात म्हटलं आहे.