अमेरिकेची काही संकेतस्थळे इसिस या गटाशी संबंधित छायाचित्रांनी विद्रुप करण्याच्या प्रकरणी फेडरल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिगेशन (एफबीआय) ही अमेरिकेची गुप्तचर संस्था चौकशी करीत आहे. संगणकांचे हॅकिंग करून ही संकेतस्थळे विद्रुप करण्यात आली असावीत असा प्राथमिक अंदाज आहे. ओहिओ येथील रेस कार स्पीडवे व मिसुरीतील गुडविल सेंटर तसेच कॅनडातील एका चर्चचे संकेतस्थळ विद्रुप करण्यात आले आहे. या संकेतस्थळांवर इसिसचा काळा झेंडा प्रदर्शित करण्यात आला. मोंटाना, न्यूयॉर्क, मॅसॅच्युसेट्स व मिनेसोटा येथील तुलनेने फार माहिती नसलेल्या संकेतस्थळांवरही इसिसने असाच प्रकार केला आहे.
एफबीआयने म्हटले आहे की, या घटनेची आम्हाला कल्पना असून ज्यांची संकेतस्थळे विद्रुप करण्यात आली आहे त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला आहे.
ही संकेतस्थळे हॅक करण्यात आली असून त्याचा इसिसशी थेट संबंध जोडता येणार नाही, असे एका संगणक सुरक्षा तज्ज्ञाने एनबीसीला सांगितले.
आर्यलडमधील डब्लिन रेप क्रायसिस सेंटरचे संकेतस्थळही विद्रुप करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर इसिसने म्हटले आहे की, आम्ही सगळीकडे आहोत. या संकेतस्थळावर इसिसचे संगीतही वाजवण्यात आले. इसिस आता ऑनलाईनवर आक्रमक प्रचार करीत असून जास्तीत जास्त लोकांना इराक व सीरियात सुरू असलेल्या जिहादच्या हिंसक लढय़ात सामील करण्याचा त्यांचा हेतू आहे.

Story img Loader