कविता लंकेश यांचा आरोप
‘भाजपने देशभरात भीतीचे वातावरण तयार केले आहे. आमच्याविरोधात बोलाल तर खर नाही, या भाजपच्या वृत्तीमुळे माध्यमांतूनही नेमकी, वास्तव माहिती मिळणे अवघड झाले आहे,’ असे निरीक्षण नोंदवत चित्रपट निर्मात्या कविता लंकेश यांनी कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता येणे व्यापक जनहिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मत नोंदवले. लंकेश पत्रिकेच्या दिवंगत गौरी लंकेश यांच्या भगिनी असलेल्या कविता यांनी कर्नाटकातील निवडणुकीबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना भाजपला लक्ष्य केले.
‘राजकीय भान असलेल्या लोकांना खरे काय, खोटे काय, याची समज असते. मात्र सामान्य व्यक्तीला माध्यमातून सातत्याने मारा होणारी माहितीच खरी वाटते. सद्य:स्थितीत माध्यमे सत्ताधारी व उद्योजकांची अंकित आहेत. त्यामुळे सामान्यांपर्यंत वस्तुस्थिती नीट पोहोचत असल्याने उपेक्षितांनी काय करायचे, ही चिंता आहे,’ असे कविता म्हणाल्या.
प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. एखादा गुन्हा घडल्यावरही भाजपने त्यालाही जातीय रंग देणे सुरू केले. कर्नाटकमध्ये जवळपास असे ८० प्रकार घडले. इतके भय कधीच नव्हते. भाजपने विकासाचा मुद्दा सोडून मंदिर, हिंदुत्व याचाच जप सुरू ठेवला. मी हिंदू आहे, याचा अभिमान आहे. मात्र हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून भाजपचे हे राजकारण पाहिले की संताप येतो, असे कविता म्हणाल्या.
कोणत्याही घटनेवर तातडीने प्रतिक्रिया देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कथुआतील अत्याचाराच्या घटनेवर चार दिवसांनी प्रतिक्रिया देतात हे अतिशय धक्कादायक आहे.
उत्तर प्रदेशातही सातत्याने अशा अत्याचाराच्या घटना समोर आल्या असताना तेथील मुख्यमंत्री कर्नाटकमध्ये प्रचाराला कसे येतात? आधी तुमच्या राज्यातील व्यवस्था पाहा मगच दुसऱ्या राज्यांमध्ये जा, असा सल्लाही कविता लंकेश यांनी दिला.
‘सिद्धरामय्यांना कल्याणकारी योजनांचा फायदा’
चित्रपटक्षेत्रातील असल्याने राजकीयक्षेत्रात अधिकारवाणीने बोलू शकणार नाही. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी गरिबांसाठी अन्न भाग्य योजना तसेच इंदिरा कँटीन सारख्या योजना सुरू केल्या. त्याचा लाभ काँग्रेसला मिळेल असा अंदाज कविता यांनी वर्तवला. तसेच देवेगौडा भाजपसोबत जातील ही शक्यता कमी असल्याचे कविता यांनी नमूद केले.