जगभरातील देशांना कोरोना महामारीच्या विळख्यात आणणाऱ्या चीनमध्ये सध्या या संसर्गाने कहर केला आहे. चीनमध्ये गेल्या दोन वर्षांतील सर्वांत मोठी रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिनपिंग सरकारने दक्षिण चीनच्या टेक्नॉलॉजिकल हब शेन्झेनमध्ये १४ मार्चपासून कडक लॉकडाउन जारी केले आहे. यामुळे शहरातील जवळपास १,७०,००,००० लोक आपल्या घरातच बंदिस्त असतील. जेव्हा शहरात एकाच दिवशी ६६ रुग्ण करोनाबाधित आढळले तेव्हा स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला.
चीनच्या जिलीन प्रांताची राजधानी चांगचूनमध्ये शुक्रवारपासूनच लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. अशात शहरातील ९० लाख लोकांना आपत्कालीन अलर्टनंतर घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच वेळी, शेडोंग प्रांतातील जवळपास ५ लाख लोकसंख्या असलेल्या युचेंगमध्ये देखील लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे चीनमधील एकूण ३ शहरे लॉकडाउनमध्ये असून २,६५,००,००० लोकांना आपल्या घरात बंदिस्त राहावे लागणार आहे.
करोना संक्रमणाच्या धोक्यावर गायीचे दूध ठरणार रामबाण उपाय; अभ्यासातून समोर आली माहिती
Huawei आणि Tencent या दोन मोठ्या चिनी कंपन्यांचे मुख्य कार्यालय शेन्झेन येथे आहे. हे शहर हाँगकाँगच्या सीमेला लागून आहे, जिथे आधीच मोठ्या संख्येने लोकांना करोनाची लागण झाली आहे. हाँगकाँगमध्ये अधिकाऱ्यांनी करोनाविषाणूच्या २७,६४७ नव्या प्रकरणांची पुष्टी केली आहे. यामुळे येथील परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे असे दिसत आहे. हाँगकाँगमध्ये आणखी ८७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यानंतर संसर्गामुळे मृतांची संख्या ३,७२९ झाली आहे.
शनिवारी चीनमध्ये कोरोना विषाणूच्या दैनंदिन प्रकरणांची नोंद झाली, जी दोन वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे दोन हजार नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये राजधानी बीजिंगमध्ये २० लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की चीनमध्ये शनिवारी कोविड-१९चे १,८०७ नवीन रुग्ण आढळले, तर १३१ रुग्ण आयात करण्यात आले. त्याच वेळी, रविवारी चीनमध्ये विक्रमी ३,३९३ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. चीनमध्ये जवळपास दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच कोरोना संसर्गाची ३३०० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. नॅशनल हेल्थ कमिशनच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०२० नंतर संसर्गाचा हा सर्वात मोठा दैनिक आकडा आहे.
युक्रेनमधून ८०० भारतीयांना सुखरूप आणून रातोरात स्टार झाली ‘ही’ पायलट; जाणून घ्या कोण आहे ती
दरम्यान, शांघायमध्ये शाळा-उद्याने बंद करण्यात आली असून बीजिंगमध्ये निवासी भागात प्रवेशावर बंदी घालण्यात आली. नवीन प्रकरणे प्राप्त झाल्यानंतर, बीजिंगमधील प्रशासनाने लोकांना घराबाहेर न पडण्यास सांगितले आहे. अगदी अत्यावश्यकतेशिवाय शहराबाहेर न जाण्याच्या सूचनाही लोकांना देण्यात आल्या आहेत.