IT Manager Manav Sharma Suicide Case: आग्रा येथे आयटी कंपनीत मॅनेजर असलेल्या मानव शर्मा यांनी पत्नीवर छळाचा आरोप करत आत्महत्या केली. अतुल सुभाष यांच्याप्रमाणेच आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड करून मानव शर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मानव शर्मा यांच्या बहिणीने आत्महत्येमागचे कारण सांगितले आहे. पत्नीशी तणावपूर्ण संबंध निर्माण झाल्यामुळेच माझ्या भावाने आत्महत्या केली, असे आकांक्षा शर्मा यांनी सांगितले. इंडिया टुडेशी संवाद साधताना आकांक्षा शर्मा म्हणाल्या की, मानवचे लग्न मोडल्यापासून तो तणावात होता. तसेच घटस्फोटाच्या प्रक्रियेत अनेक कायदेशीर अडचणी असल्याच्या दबावातून त्याने आत्महत्या केली.

पत्नीचं प्रेमप्रकरण कळल्यानंतर तणाव वाढला

“जानेवारी २०२५ मध्ये मानवला निकीताच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर दोघांनी संमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. पण घटस्फोट इजक्या सहजासहजी मिळणार नाही, याची त्याला कल्पना होती. निकीताच्या प्रेम प्रकरणामुळे त्याने आत्महत्या केलेली नाही तर घटस्फोटात येणाऱ्या संकटाला कंटाळून त्याने जीवन संपविले. सर्व कायदे महिलांच्या बाजूने आहेत”, असे आकांक्षा शर्मा यांनी सांगितले.

आकांक्षा पुढे म्हणाल्या की, प्रिया नावाच्या एका महिलेने त्यांना सांगितले की, निकीता आणि तिच्या दोन बहिणी विवाहित पुरूषांना हेरून त्यांचे आयुष्य उध्वस्त करतात. हे कळल्यानंतर मानवने जानेवारी महिन्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण आई-वडिलांनी मुंबईला वेळीच धाव घेऊन त्याला रोखले होते. तसेच मानव आणि निकीता यांची समजूत काढून त्यांना एकोप्याने राहण्याची विनंती केली होती.

यानंतर दोघांनीही संमतीने घटस्फोट घेण्याचे मान्य केले होते. मानवने निकीतापासून वेगळे राहण्यास सुरूवात केली होती. पण निकीता कायद्याची भीती दाखवून त्याला धमकावत होती. जर मानवने घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीच निकीताने दिली होती, असेही मानव यांच्या बहिणीने सांगितले.

२३ फेब्रुवारी रोजी दोघेही मुंबईहून आग्र्याला आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांची आणि वकिलांची भेट होणार होती. पण वकिलांना भेटण्याऐवजी निकीताने मानवला तिच्या माहेरी नेले. तिथे पुन्हा एकदा त्याला घटस्फोट घेऊ नको म्हणून दबाव टाकण्यात आला.

व्हिडीओमध्ये मानव शर्मा यांनी काय आरोप केले

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मानव शर्मा गळ्यात फास लावून रडताना दिसत आहे. तसेच “पुरुषांबद्दल विचार करा” अशी विनंती तो प्रशासनाकडे करत आहे. तो इशारा देताना दिसतो की, जर का कायद्याने पुरुषांचे रक्षण केले नाही तर आरोप करण्यासाठी भविष्यात पुरुष शिल्लक राहाणार नाहीत. माझ्या पालकांना धक्का लावू नका, असेही मानव याने त्याच्या व्हिडीओच्या शेवटी सांगितले.

पत्नीने आरोप फेटाळले

मानव शर्माच्या पत्नीने मात्र तिच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. तसेच तिने आरोप केला आहे की तिच्या पतीला दारूचे वेसण होते आणि त्याने यापूर्वीही स्वत:ला इजा करण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता.

“तो प्रचंड प्रमाणात मद्यपान करत असे आणि त्याने यापूर्वी अनेकदा आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले आहेत. मी तीन वेळा वाचवले. मद्य घेतल्यानंतर तो मला मारहाण देखील केली आहे. मी सासरच्यांना अनेकदा याबद्दल सांगितले, पण त्यांनी मा‍झ्या विनंतीकडे दुर्लक्ष केले,” असे मानव शर्माच्या पत्नीने सांगितले.

Story img Loader