मेघालयच्या पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यातील एका खाणीत पाच कामगार गेल्या ११ दिवसांपासून अकडले आहेत. खाणीतील पाण्याची पातळी कमी झाली असली तरी कामागारांना बाहेर काढण्यासारखी परिस्थिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. डायनामाइटच्या स्फोटामुळे खाण खचली होती. त्यामुळे येथे पाच खाण कामगार अडकले आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बचाव पथकाला कामगारांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या ११ दिवसांपासून पाच खाण कामगार बेकायदा असलेल्या कोळशाच्या खाणीत अडकले आहेत. स्फोटानंतर खाणीत पाण्याची पातळी वाढत गेली आणि हे कामगार अडकले. त्यानंतर आता पाण्याची पातळी काही प्रमाणात खाली आली आहे, परंतु बचाव पथकाला आत काम सुरू करण्यासाठी पुरेशी जागा नाही, असे एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.

खाणीतून ८.८२ लाख लिटर पाणी बाहेर काढण्यात यश

पाणी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. ४ जून रोजी ४६ मीटरवर असलेली पाण्याची पातळी सुमारे ३६.६ मीटरपर्यंत कमी झाली आहे. एनडीआरएफचे सुमारे ६० कर्मचारी बचावकार्य करत आहेत. १५२  मीटर खोल खड्ड्यातील पाण्याची पातळी १० मीटरपर्यंत खाली येण्याची ते वाट पाहत आहेत. कारण कामगारांना बाहेर काढण्यासाठी जास्तीत जास्त जागेची गरज आहे असे अधिकाऱ्यांनी पीटीआयसोबत बोलताना सांगितले. आतापर्यंत एकूण ८.८२ लाख लिटर पाणी बाहेर काढण्यात आलं आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नौदलाकडे मागितली मदत

“बचाव कार्यात थोडी प्रगती होत असली तरी वेळ खूप लागत आहे. त्यामुळे आम्ही नौदलाची मदत उपलब्ध करुन देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाला पत्र लिहिले आहे,” असे मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड के संगमा म्हणाले.

पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्याच्या मुख्यालयपासून २० किमीच्या अंतरावर असलेल्या या खाणीमध्ये डायनामाईट स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. २०१४ मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी)ने खाणकामांवर बंदी आणल्यानंतर मेघालयात धोकादायक कोळसा खाणींच्या उत्खननास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र तरीही या खाणींमध्ये अवैधरित्या काम सुरु होते.

खाणीत अडकलेल्या पाच जणांची ओळख जिल्हा प्रशासनाने पटविली आहे. त्यातील चार कामगार आसाममधील आणि एक त्रिपुरा येथील आहे. कोळशाच्या खाणीचा मालक शायनिंग लांगस्टॅंग याला पोलिसांनी अटक केली आहे तर खाणीचा व्यवस्थापक अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच अन्य बेकायदा खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fear that five workers have been trapped in meghalaya mine for 11 days asked the navy for help abn