देशाचे होऊ घातलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भीतीने कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमने पाकिस्तानमधील त्याचा तळ पाक-अफगाण सीमेवर हलविला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.   निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी एका गुजराती वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दाऊदवर कडक कारवाईचे संकेत दिले होते. त्यामुळे मोदी पंतप्रधान झाल्यावर आता दाऊदचा ठावठिकाणा शोधून काढून त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करतील असा गुप्तचर विभागाचा अंदाज आहे.
गुप्तचर सुत्रांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेतृत्वाखाली एबोट्टाबाद येथील कारवाईत अमेरिकन लष्कराला ओसाबा बिन लादेनचा खुर्दा पाडण्यात यश आले होते. त्यामुळे आता भारतात नरेंद्र मोदींच्या निवडणुकीतील विजयामुळे दाऊदच्या चिंतेत भर पडली आहे. यापार्श्वभूमीवर दाऊदने भीतीमुळे त्याचा पाकिस्तामधील तळ पाक-अफगाण सीमेवर हलवला असून, आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडे त्याने अधिक सुरक्षेची मागणी देखील केली असल्याचे गुप्तचर सुत्रांच्या अहवालात म्हटले आहे. तसेच गुप्तचर विभागाचे माजी संचालक अजित दोवल यांनीही सोमवारी नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना देशासमोरील सुरक्षाविषयक प्रश्नांची माहिती दिली आहे. त्यामुळे दाऊदसह त्याच्या टोळीतील इतर हस्तकही धास्तावले असल्याची चर्चा आहे.

Story img Loader